एखादा चित्रपट हिट झाला की प्रेक्षकांना तो पुन्हा पुन्हा पाहायचा असतो. याचा फायदा घेत निर्माते लगेचच सिक्वेल बनवतात. अनेक वेळा सिक्वेल हिट झाला तरी त्याच चित्रपटाचा पुढचा भाग बनवायला निर्माते चुकत नाहीत. अशाच एका गाजलेल्या सिनेमा सिक्वेल चाहत्यांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट आहे 'धमाल ४' (Dhamaal 4). धमाल बॉलीवूडच्या त्या प्रसिद्ध कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक आहे, ज्यांचे पात्र कल्ट आहेत आणि प्रेक्षक आजही ते पाहताना एन्जॉय करतात. अभिनेता अजय देवगण याने सोशल मीडियावर 'धमाल ४' सिनेमाबद्दल अपडेट दिलं आहेे.
अजय देवगण आणि रितेश देशमुख एकीकडे 'रेड २' प्रदर्शित होणार असल्याने चर्चेत आहेत, तर दुसरीकडे दोघांनी 'धमाल ४' चित्रपटाचं शुटिंग पुर्ण केलं आहे. अजय देवगण काही फोटो पोस्ट करत इंद्रकुमार दिग्दर्शित 'धमाल ४'चित्रपटाचं पहिल्या शेड्यूलचं शुटिंग हे माळशेज घाटात पुर्ण झाल्याचं सांगितलं. तर लाफ्टर राईडवर नेणाऱ्या या चित्रपटाचे पुढील शूटिंग शेड्यूल मुंबईत होणार आहे.
'रेड २'मध्ये आमने सामने उभे ठाकलेले अजय-रितेश या चित्रपटात एकत्र मिळून धमाल करणार आहेत. त्यांच्या जोडीला अरशद वारसी, जावेद जाफरी, संजीदा शेख, अंजली आनंद, संजय मिश्रा, विजय पाटकर आणि उपेंद्र लिमये हे कलाकारही 'धमाल' करत आहेत. या चित्रपटाचे लेखन बलविंदर सिंग सूरी, परितोष पेंटर आणि बंटी राठोड यांनी केले आहे.
धमाल २००७ मध्ये धमाल पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. यानंतर २०११ मध्ये धमालचा सिक्वेल आला. यानंतर २०१९मध्ये धमालचा तिसरा भाग 'टोटल धमाल' आला. ज्यामध्ये अजय देवगण, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांसारख्या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारली होती. आता 'धमाल ४' येतोय हे कळताच प्रेक्षक खूश झाले आहेत. चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.