बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याचा आज (२ एप्रिल) वाढदिवस असून त्याचे वडील वीरू देवगण हे प्रसिद्ध स्टंटमन होते. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशी आज अजयची ओळख आहे. अजयने कॉमेडी, अॅक्शन असे सगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. पण ‘सिंघम’ या चित्रपटानंतर अॅक्शन स्टार हीच त्याची ओळख रूढ झाली.
अजयने फूल और काटे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यानंतर अजयने कधीच मागे वळून पाहिले नाही. अजयने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे जाहिरात जगतात देखील त्याला चांगलीच मागणी आहे. आज अजयने त्याच्या कष्टाने चांगलाच पैसा कमावला आहे. केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील त्याची मालमत्ता आहे.
दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, अजयचे मुंबईत मोठाले घर आहे. पण त्याचसोबत त्याचा लंडनमध्ये एक बंगला असून याची किंमत ५४ कोटीहून अधिक आहे. एवढेच नव्हे तर अजयकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट असून याची किंमत तब्बल ८४ कोटी असल्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. अजयच्या नावाचे अजय देवगण फिल्म्स प्रोडक्शन हाऊस असून या प्रोडक्शन हाऊसने आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती कली आहे. अजयला गाड्यांची देखील प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे २.८ कोटी किमतीची मासेराटी क्वाट्रोपोर्टे ही गाडी आहे. ही गाडी घेणारा अजय भारतातील पहिला व्यक्ती आहे. तसेच त्याच्याकडे मर्सिडीज बेंज एस क्लास, बीएमडब्ल्यू जेड, मर्सिडीज जीएल क्लास, मिनी कूपर एस ऑडी क्यू ७ अशा अनेक कार आहेत.
अजय देवगणचे लग्न अभिनेत्री काजोलसोबत झाले असून त्यांना निसा आणि युग अशी दोन मुले आहेत. अजय आणि काजोल यांचा प्रेमविवाह असून त्यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केले होते. त्यांनी प्यार तो होना ही था, टूनपूर का सुपर हिरो, राजू चाचा, गुंडाराज यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.