Join us

ट्विटरवर का ट्रेंड होतेय ‘अजय देवगन कायर है’? काय आहे भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 2:47 PM

सध्या अजय अचानक चर्चेत आला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अजय देवगण ट्विटरवर ट्रेंड करतोय.

ठळक मुद्देगत महिन्यात अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट केले होते. यानंतर शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला होता. यावेळी अजयने रिहानाच्या ट्विटच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट केली होती.

अजय देवगण तसा आपल्या कामाशी काम ठेवणारा अभिनेता. पण सध्या अजय अचानक चर्चेत आला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अजय देवगण ट्विटरवर ट्रेंड करतोय. ‘अजयदेवगणकायरहै’ हा हॅशटॅग सध्या टॉप ट्रेंडमध्ये आहे. काही लोक अजयला जबरदस्त ट्रोल करत आहेत. आता का? तर कालच्या एका प्रकरणामुळे.होय, काल अजय मुंबईच्या फिल्मसिटीकडे जात असताना एका शिख युवकाने अजयची गाडी अडवून शेतकरी आंदोलनावर कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे त्याला चांगलेच सुनावले होते.  

मंगळवारी सकाळी गोरेगावमधील दिंडोशी परिसरातील ही घटना घडली होती. अजय देवगण आपल्या कारच्या आत बसलेला  असताना आरोपी राजदीप सिंहने अजयला ‘पंजाबचा शत्रू’ म्हणत 15 ते 20 मिनिटे त्याची गाडी अडवून धरली होती. शेतकरी आंदोलनावर आत्ता तरी बोल, असा आग्रह करत या युवकाने गोंधळ घातला होता. यानंतर पोलिसांनी राजदीपला अटक केली होती.

याचा व्हिडीओ काल चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणाच्या काही तासानंतर राजदीपची जामीनावर सुटका झाली. या सगळ्या प्रकरणानंतर आज अजय देवगण सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. लोकांनी त्याला ‘कायर’ ठरवले. तू खोटा सरदार आहेस, असे काय काय लोकांनी म्हटलेय.

गत महिन्यात अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट केले होते. यानंतर शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला होता. यावेळी अजयने रिहानाच्या ट्विटच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट केली होती. ‘भारत वा भारताच्या धोरणांविरोधात पसरवण्यात येणा-या खोट्या प्रचारात अडकू नका. यावेळी एकजूट होत अंतर्गत कलहाशी लढणे अधिक महत्त्वपूर्ण आहे,’ असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले होते.

टॅग्स :अजय देवगणशेतकरी आंदोलन