कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत. लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, घरात असलेल्या लोकांना काही गरज असेल तर मदत व्हावी यासाठी पोलिस दिवसातील कित्येत तास काम करत आहेत. काम करताना कोरोनाची लागण देखील होऊ शकते याची त्यांना चांगली कल्पना असली तरी ते आपले काम खूपच चांगल्याप्रकारे करत आहेत. त्यांच्या या कामासाठी बॉलिवूडच्या सिंघमने त्यांचे कौतुक केले आहे.
अभिनेता अजय देवगणने खास मुंबई पोलिसांसाठी ट्वीट केले आहे. त्याने या ट्वीटमध्ये म्हटले आहे, मुंबई पोलिस हे जगातील सगळ्यात चांगल्या पोलिसांपैकी एक असल्याचे मानले जाते. कोरोनाने थैमान घातले असूनही तुम्ही जे काम करत आहात ते कौतुकास्पद आहे. तुम्ही जेव्हा हुकूम कराल त्यावेळी सिंघम त्याचे खाकी कपडे घालून तुमच्यासोबत काम करेल... जय हिंद... जय महाराष्ट्र...
मुंबई पोलिसांनी त्यांचा काम करतानाचा अनुभव एका व्हिडिओद्वारे रेकॉर्ड केला असून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला देखील अजयने रिट्वीट केले आहे.
मुंबई पोलिसांच्या ट्वीटची नेहमीच चर्चा रंगते. आता देखील अजयच्या ट्वीटवर त्यांनी खूप छान रिप्लाय दिला आहे. त्यांनी लिहिले आहे की, डिअर, सिंघम... खाकीत असलेल्या लोकांनी परिस्थिती सामान्य होण्यासाठी (वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई) जी कामं करायला पाहिजेत तीच कामं आम्ही करत आहोत...
अजय देवगण गंगाजल, सिंघम यांसारख्या चित्रपटांमध्ये पोलिसांच्या भूमिकेत दिसला आहे. त्याच्या सिंघम या चित्रपटाच्या सगळ्याच भागांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.