बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या आगामी 'मैदान' या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतीच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता 'मैदान' या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमुळे चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या सिनेमाची चाहते वाट पाहत होते. अखेर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'मैदान' सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. "आजाओ मैदान मे...इंडियन फुटबॉलच्या इतिहासातील सुवर्णकाळ ठरलेली ही कथा दाखवण्यासाठी आम्ही तयार आहोत," असं त्याने म्हटलं आहे. या टीझरमध्ये काही मुलं चिखलात फुटबॉल खेळताना दिसत आहेत. तितक्यात अजय देवगण तिथे येतो आणि बॉलला किक मारतो, असा हा टीझर आहे. अवघ्या ३६ सेकंदाच्या या सिनेमाच्या टीझरने मैदानबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'मैदान' सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार सैय्यद अब्दुल रहीम यांची गोष्ट या सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. अमित शर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अजय देवगणबरोबर प्रियमणि, गजराज राव आणि रुद्रनील घोष यांचीही भूमिका आहे.
अजय देवगणच्या 'मैदान' या सिनेमाचं पहिलं पोस्टर २०२०मध्ये शेअर करण्यात आलं होतं. तेव्हा २०२०च्या नोव्हेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार होता. पण, काही कारणांमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर २०२३च्या जूनमध्ये मैदान रिलीज होण्याच्या चर्चा होत्या. पण, काही कारणांमुळे या सिनेमाला विलंब होत होता. आता अखेर जवळपास ४ वर्षांनी येत्या एप्रिल महिन्यात ईदच्या मुहुर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.