बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेला 'मैदान' सिनेमा आज(११ एप्रिल) रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार होता. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाच्या प्रेक्षक प्रतिक्षेत होते. गेल्या चार वर्षांपासून या सिनेमाला मुहुर्त मिळत नव्हता. अखेर ईदच्या मुहुर्तावर अजय देवगणचा 'मैदान' प्रदर्शित होणार होता. पण, हा सिनेमा प्रदर्शितच झालेला नाही. प्रदर्शनाच्या दिवशीच पुन्हा एकदा मैदानची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. यामागचं कारणही समोर आलं आहे.
मैसूर कोर्टाने 'मैदान'च्या प्रदर्शनावर बंदी घातली असून सिनेमा रिलीज न करण्याचे आदेश दिले आहेत. लेखक अनिल कुमार यांनी मैदान सिनेमाची कथा चोरल्याचा आरोप मेकर्सवर केला आहे. याबाबत त्यांनी मैसूर कोर्टात धाव घेतल्याने न्यायालयाने मैदान सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याचे आदेश दिले आहेत. १९५०च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतून भारतीय फुटबॉल टीम बाहेर पडल्याच्या अनुषंगाने २०१० मध्ये त्यांनी एक कथा लिहिली होती. मुंबई स्क्रीन रायटर्स असोसिएशनमध्ये त्यांनी ही कथा Paadanduka या नावाने रजिस्टर केली होती, असा दावा अनिल कुमार यांनी केला आहे. त्याबरोबरच मैदानचे सहाय्यक दिग्दर्शक सुखदास सूर्यवंशी यांनी २०१९मध्ये त्यांच्यासोबत कथेबाबत बोलणीही केली होती. तेव्हा सुखदास यांनी अनिल कुमार यांना आमिर खानची भेट घडवून देईन, असंही सांगितल्याचं अनिल कुमार म्हणाले.
'न्यूज १८'ला दिलेल्या मुलाखतीत अनिल कुमार म्हणाले, " २०१०मध्ये मी कथा लिहायला सुरुवात केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये मी याबाबत लिंक्डइनवर पोस्टही केली होती. त्यानंतर सुखदास सूर्यवंशी यांनी मला संपर्क केला होता. त्यांनी मला मुंबईला बोलवून स्क्रिप्ट आणण्यास सांगितलं होतं. माझ्याकडे संपूर्ण चॅट हिस्ट्रीदेखील आहे. 'मैदान' सिनेमा रिलीज होतोय असं मी ऐकलं. मी आश्चर्यचकित झालो कारण माझी कथाही सेमच होती. जेव्हा मी ट्रेलर पाहिला तेव्हा मला कळलं की ही माझीच कथा आहे. मुख्य कथेत बदल करून त्यांनी हा सिनेमा बनवला आहे."
अजय देवगणचा 'मैदान' सिनेमा भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केलं असून बोनी कपूर यांची निर्मिती आहे. अजय देवगणबरोबर या सिनेमात प्रियामणि, गजराज राव, रुद्रनील घोष यांच्या मुख्य भूमिका आहेत.