दरवर्षी ईदच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर सिनेमांची मेजवानी मांडली जाते. यंदाही ईदच्या मुहुर्तावर बॉलिवूडमधील दोन बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. गुरूवारी(११ एप्रिल) 'मैदान' आणि 'बडे़ मियां छोटे मियां' हे दोन सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. या बहुचर्चित सिनेमांच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. 'बड़े मियां छोटे मियां' आणि 'मैदान' या दोन्ही सिनेमांमध्ये पहिल्या दिवशी तगडी टक्कर पाहायला मिळाली. या सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असलेल्या 'बड़े मियां छोटे मियां' या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. अॅक्शनपट असलेल्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या सिनेमातून अक्षय आणि टायगरच्या अॅक्शनचा तडका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 'बड़े मियां छोटे मियां' सिनेमा बॉक्स ऑफिसवर 'मैदान'च्या तुलनेत वरचढ ठरला आहे.
फुटबॉल प्रशिक्षक सय्यद रहीम यांच्या संघर्षाची कथा सांगणारा 'मैदान' सिनेमाला गेल्या चार वर्षांपासून मुहुर्त मिळत नव्हता. अखेर ईदच्या मुहुर्तावर हा सिनेमा गुरूवारी प्रदर्शित करण्यात आला. अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 'मैदान'ला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, ३५० कोटींचं बजेट असलेल्या 'बड़े मियां छोटे मियां' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १५.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. हा सिनेमा प्रदर्शनाच्या दिवशी १८-२० कोटींची कमाई करेल, अशी अपेक्षा होती. तर दुसरीकडे १०० कोटींचं बजेट असलेला 'मैदान' पहिल्या दिवशी केवळ ७.१० कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला बॉक्स ऑफिसवर कोण वरचढ ठरणार हे पाहावं लागेल.