Drishyam 2 Advance Booking: या वर्षात बॉलिवूडचे अनेक बडे सिनेम आलेत आणि आलेत तसे दणकून आपटले. आमिरचा ‘लालसिंग चड्ढा’, अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, रामसेतू असे सगळे सिनेमे फ्लॉपच्या रांगेत जाऊन बसले. अशात अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) येतोय आणि हा सिनेमा येतोय म्हटल्यावर बॉलिवूडच्या आशांना पुन्हा एकदा पालवी फुटली आहे. तूर्तास तरी या सिनेमाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसतेय. येत्या 18 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय आणि त्याआधी एक चांगली बातमी आहे.
होय, ‘दृश्यम 2’च्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मीडिया रिपोर्टनुसार, ओपनिंग वीकेंडसाठी ‘दृश्यम 2’ची 43,633 तिकिटं विकली गेली आहेत. अद्याप ‘दृश्यम 2’ रिलीज व्हायला चार दिवसांचा काळ आहे. अशात अॅडव्हान्स बुकिंगचा आकडा आणखी वाढू शकतो. अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना अशी जबरदस्त स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने युए सर्टिफिकेट दिलं आहे. 142 मिनिटांच्या म्हणजेच 2 तास 22 मिनिटांच्या या सिनेमात प्रेक्षकांना बरंच काही बघायला मिळणार आहे. विजय साळगावकरची फाईल पुन्हा उघडणार आहे. विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचं रक्षण करू शकेल का? याचं उत्तर या सिनेमात मिळणार आहे.
‘दृश्यम’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन सात वर्ष झाली आहे. तब्बल सात वर्षांनी या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दृश्यम’ हा सिनेमा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. हा 2013 मध्ये रिलीज झालेल्या एका मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक होता. ‘दृश्यम 2’ हा सुद्धा मल्याळम सिनेमाचाच हिंदी रिमेक आहे. चौथी नापास असलेला विजय आणि त्याच्या कुटुंबाची कथा चाहत्यांना प्रचंड भावली होती. एका हत्या प्रकरणामुळे विजयचं कुटुंब अडचणीत येतं. विजय अतिशय शिताफीनं त्याच्या कुटुंबाला या प्रकरणातून वाचवतो. शेवटपर्यंत खिळवून ठेवणाºया या चित्रपटानं चाहत्यांना वेड लावलं होतं.