अजय देवगण (Ajay Devgn) बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. १९९१ साली आलेल्या 'फूल और काँटे' मधून त्याने पदार्पण केलं. तेव्हापासून आजपर्यंत तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अजय देवगणने अनेक अभिनेत्रींसोबत रोमान्स केला आहे. पण एका दिग्गज अभिनेत्रीसोबत कधीच काम न करण्याची त्याने शपथच घेतली. ती अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी (Sridevi). अजयच्या या निर्णयामागे खरं काय कारण होतं जाणून घेऊया.
श्रीदेवी यांचा 'खुदा गवाह' सिनेमा आठवतोय? अमिताभ बच्चन, नागार्जुन यांचीही सिनेमात मुख्य भूमिका होती. अजय देवगणच्या पदार्पणानंतर पुढच्याच वर्षी 1992 साली हा सिनेमा आला होता. खुदा गवाह साठी आधी अजय देवगणला घेण्यात येणार होतं. मात्र ऐनवेळी साऊथ सुपरस्टार नागार्जुनची निवड करण्यात आली. श्रीदेवी यांनीच अजयला काढून नागार्जुनला घेतल्याची चर्चा होती. याचा अजयला राग आला आणि त्याने नंतर कधीच श्रीदेवी यांच्यासोबत काम केलं नाही.
या चर्चांवर एका मुलाखतीत श्रीदेवी म्हणाल्या होत्या की, "मी कशाला त्याला सिनेमातून काढू? त्याला साईन केलंय हेच मुळात मला माहित नव्हतं. सिनेमात कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे काम निर्मात्याचं आहे. माझा त्यात काहीच हात नव्हता."
श्रीदेवी यांचा 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत मृत्यू झाला. बाथटबमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या अकस्मात मृत्यूनंतर सिनेसृष्टी धक्क्यात होती. तेव्हा अजय देवगणने त्यांच्यासोबत काम करुन न शकल्याचं दु:ख व्यक्त केलं होतं.