Ajay Devgn responded to Kiccha Sudeep's comment : साऊथ चित्रपटांचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. पुष्पा, आरआरआर आणि आता केजीएफ 2 या चित्रपटांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. अगदी या चित्रपटांपुढे बॉलिवूड चित्रपट झाकोळल्या गेलेत. तूर्तास यावरून भाषेचा नवा वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. या वादाची सुरूवात झाली ती साऊथचा लोकप्रिय ‘खलनायक’ किच्चा सुदीपच्या ( Kiccha Sudeep) एका वक्तव्यानं. ‘हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही’, असं किच्चा एका इव्हेंटमध्ये म्हणाला आणि त्याच्या याच वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनं ( Ajay Devgn ) या वक्तव्यानंतर किच्चाला परखड उत्तर दिलं आहे.
अजयचं ट्विट हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही, या किच्चा सुदीपच्या वक्तव्यावर अजय देवगणनं ट्विट केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे. ‘किच्चा सुदीप, माझ्या भावा, तुझ्या मतानुसार, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाहीये तर मग तू तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? हिंदी आमची मातृभाषा व राष्ट्रभाषा होती व नेहमी राहील...’, असं अजय देवगणने म्हटलं आहे.
किच्चा दिलं अजयला उत्तर अजयच्या या ट्विटटला किच्चाने उत्तर दिलं आहे. ‘हॅलो, अजय देवगण सर,... मी ते वाक्य ज्या संदर्भाने बोललो, तो संदर्भ कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. मी प्रत्यक्षात भेटल्यावर ते कदाचित तुम्हाला पटवून देईल. माझं ते विधान कोणाच्याही भावना दुखावण्याच्या किंवा यावरून वाद निर्माण करण्याचा उद्देशाने नव्हतं. मी असं का करू सर? तुझं हिंदीतील ट्विटचा अर्थ मला कळला, कारण मी हिंदीचा आदर करतो. या भाषेवर आपलं प्रेम आहे. मी भारतातील प्रत्येक भाषेवर प्रेम करतो. मी हा मुद्दा आणखी ताणू इच्छित नाही. मी ते पूर्णत: वेगळ्या संदर्भाने बोललो होतो. लवकरच भेटू ही अपेक्षा,’ असं म्हणत किच्चा सुदीपने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाला होता किच्चा सुदीप? किच्चा सुदीपने एका चित्रपटाच्या लाँचिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्याने दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? या सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. ‘दाक्षिणात्य दिग्दर्शक सध्या अशा चित्रपटांची निर्मिती करत आहे ज्याचे जागतिक स्तरावर अस्तित्व असेल. बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक निर्माते हे तेलुगू आणि तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. सध्या दक्षिणेत अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे, असे तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात. पण मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हे तितकं यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत’, असं दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप म्हणाला होता.