अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'भोला' ( Bholaa) या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. आता अजयने या सिनेमातील ६ मिनटांच्या एका सीनची झलक शेअर केली आहे. असा हाय ॲक्शन सीन आजपर्यंत अजयच्या कुठल्याच सिनेमात तुम्ही पाहिला नसेल. बाईक राईड व ट्रक चेजचा हा सीन शूट करणं सोप्प नव्हतं. अजय व त्याच्या टीमने या सहा मिनिटांच्या सीनसाठी अथक मेहनत घेतली. हा ॲक्शन सीन अजयने त्याचे वडील वीरू देवगण यांना समर्पित केला आहे.
या जबरदस्त ॲक्शन सीन शूट करण्यासाठी ११ दिवस लागलेत आणि या ॲक्शन सीन्सच्या तयारीवर तब्बल ३ महिने खर्च केले गेलेत. अजयने शेअर केलेल्या व्हिडीओची सुरूवात एका वाक्याने होते. चित्रपटातील हा ॲक्शन सीन माझे वडील वीरू देवगण यांना समर्पित करतो. ज्यांनी मला सर्व काही शिकवलं, असं सुरूवातीला लिहून येतं.
६ मिनिटांच्या बाईक ट्रक चेज सीन... ११ दिवसांचं शूटींग... अतिशय महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच जोखमीची बाईक ट्रक चेज, ज्याच्या प्लॅनिंगसाठी ३ महिने लागलेत, असं सांगण्यात येतं. व्हिडीओत अजय स्वत: सीनवर काम करताना दिसतोय. आधी तो खेळण्यातील ट्रक व बाईक वापरून चर्चा करताना दिसतो. हा सीन कसा शूट होणार, याचं प्लानिंग करताना दिसतो.
'भोला' हा सिनेमा येत्या ३० मार्चला रिलीज होतोय. या चित्रपटात अजयसोबत तब्बू लीड रोलमध्ये आहे. सिनेमात अजय मुख्य भूमिकेत आहे आणि त्यानेच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. अजयचा हा चित्रपट २०१९ साली रिलीज झालेल्या कैथी या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.