‘मीटू’अंतर्गत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झालेत. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ आलोक नाथ, अभिजीत, विकास बहल, साजिद खान असे अनेक या वावटळीत सापडले. या लोकांची नावे समोर येताच इंडस्ट्रीतील अनेकांनी त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. अर्थात याऊपरही अजय देवगणच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात आलोक नाथ यांची वर्णी लागलीच. बलात्काराचा आरोप असलेल्या आलोक नाथ यांच्या कमबॅकसाठी अजयसारख्या सुपरस्टारने मदत करावी, ही गोष्ट अनेकांना खटकली. ‘मीटू’ मोहिमेला वाचा फोडणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने यानिमित्ताने अजयवर तोंडसुख घेतले. आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करणा-या विनता नंदा यांनीही अजयला सुनावले. आता अजयने या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
होय, आलोक नाथ यांच्यावर आरोप झाले, त्याआधीच ‘दे दे प्यार दे’चे शूटींग पूर्ण झाले होते, असा खुलासा अजयने केला आहे. ‘दे दे प्यार दे’चे शूटींग गतवर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाले होते. गतवर्षी आॅक्टोबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता. आलोक नाथ यांनीही २०१८ मध्येच त्यांच्या वाट्याचे काम पूर्ण केले होते. संपूर्ण टीक वेगवेगळ्या सेटवर आऊटडोअर शूटींग करत होती. ४० दिवसांत हा चित्रपट पूर्ण झाला. आलोक नाथ यांच्यावर आरोप झालेत, तोपर्यंत शूटींग पूर्ण झाले होते. त्यांच्यासोबतचे अन्य कलाकार अन्य प्रोजेक्टमध्ये बिझी झाले होते. अशाच आलोक नाथ यांना रिप्लेस करणे अशक्य होते. पुन्हा नव्याने शूटींग करायचे म्हटल्यास यात निर्मात्यांचे प्रचंड नुकसान झाले असते, असे अजयने स्पष्ट केले.
‘मीटू’ मोहिम सुरु झाली, तेव्हा मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. मी महिलांचा प्रचंड आदर करतो. महिलांशी गैरवर्तन करणा-यांना आमचा विरोध आहे आणि असेल. आजही या मुद्यावर माझी तीच भूमिका आहे, जी आधी होती, असे अजयने सांगितले. आता अजयच्या या खुलाशाने तनुश्री दत्ता व विनता नंदा यांचे किती समाधान होते, ते बघूच.