काही दिवसांपूर्वी अजय देवगणने (Ajay Devgn) केरळस्थित सबरीमाला मंदिराला (Sabarimala Tample ) भेट देत भगवान अयप्पा यांचं दर्शन घेतलं होतं. या मंदिरात जाण्याआधी करावं लागणारं व्रतही अजयनं पूर्ण केलं होतं. यासाठी तो 11 दिवस चटईवर झोपला होता, काळे वस्त्र परिधान करणं, अनवाणी फिरणं, रोज संध्याकाळी पूजाअर्चा करून तुळशीची माळ घालणं, मद्यपान, मांसाहार व परफ्युमचा त्याग करत त्याने कडक नियमांचं पालन केलं होतं. अजयने घेतलेल्या या कठीण व्रताबद्दल ऐकून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. पण आता अजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय आणि यामुळे अजय ट्रोल होतोय.
केरळच्या एका स्थानिक वृत्त वाहिनीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओत काही लोक अजयला आपल्या खांद्यावर वाहून मंदिराकडे नेत असताना दिसत आहेत. अजय देवगण पालखीत बसून मंदिराकडे जाताना दिसतोय. अजय काही प्रकृती कारणास्तव पालखीत बसून मंदिरात गेला, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पण याऊपर अजयचा हा व्हिडीओ व्हायरल होताच, लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
चित्रपटात मोठमोठे अॅक्शन सीन्स करणाऱ्या अजयच्या पायात मंदिरात चालून जाण्याइतकीही ताकद उरली नव्हती का? असा सवाल अनेक युजर्सनी केला आहे. यापेक्षा ऑनलाईन दर्शन घ्यायचं असतं, अशी खोचक कमेंट एका युजरने केली आहे. अनेकांनी अजयचा हा व्हिडीओ पाहून त्याची तुलना विवेक ओबेरॉयशी केली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय गेल्या 18 वर्षांपासून सलग सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी येतोय. प्रत्येकवेळी विवेक ओबेरॉय पायी चालत जात भगवान अयप्पांचं दर्शन घेतो.
अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच दाक्षिणात्य चित्रपट ‘कैथी’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या हिंदी चित्रपटाचं नाव ‘भोला’ असणार आहे. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या सिंघम 3 आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत थँक गॉड या चित्रपटामध्ये दिसणार आहे. एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या सिनेमातही अजय झळकणार आहे.