Drishyam 2 Box Office Collection Day 2: सुमारे 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘दृश्यम’चा सेकंड पार्ट अर्थात ‘दृश्यम 2’ रिलीज झाला. ‘दृश्यम 2’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शुक्रवारी हा सिनेमा रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धमाका केला.
‘दृश्यम 2’च्या अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे सिनेमा दमदार ओपनिंग करणार, हे ठरलं होतं. झालंही तसंच. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 15.38 कोटींची कमाई केली. काल शनिवारी दुसऱ्या दिवशी ‘दृश्यम 2’च्या कमाईत 45 टक्के वाढ दिसली.
दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21.59 कोटींचा गल्ला जमवला. याचसोबत दोन दिवसांत या सिनेमाने एकूण 36.97 कोटींचा बिझनेस केला. ‘ब्रह्मास्त्र’नंतर ‘दृश्यम 2’ या वर्षीचा दुसरा बिग ओपनर सिनेमा ठरला. आज रविवारी कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मते, पहिल्या वीकेंडला चित्रपटाची कमाई 50 कोटींचा आकडा पार करेल, अशी शक्यता आहे.
तूर्तास मेट्रो सिटीज्मध्ये अनेक ठिकाणी ‘दृश्यम 2’ हाऊसफुल्ल आहे. सिंगल स्क्रिनवरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद आहे.
अशी आहे कथाविजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची हि कथा आहे. 4 ऑक्टोबर 2014 च्या रात्री घडलेल्या घटनेतील दुसरा ट्रॅक ओपन करत चित्रपटात रंगत आणली आहे. केबल चालवणाऱ्या विजयनं प्रगती केली आहे. घरासमोरील जमिन विकून थिएटर उभारलं आहे. तो चित्रपटाची निर्मितीही करत आहे. त्याची कथा त्यानं पुस्तक रूपात प्रकाशित केली आहे. सॅमची बॉडी न मिळाल्यानं पोलिसांचं शोधकार्य सुरूच आहे. पोलीस कधीही पुन्हा येऊ शकतात हे माहित असल्यानं विजयही गाफील नाही. विजयच्या घरासमोर राहणाऱ्या जेनीला तिचा दारुडा नवरा बेदम मारहाण करत असतो. जेनीला नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार करायला विजय सांगतो आणि दुसऱ्या भागात पहिल्यांदा त्याची पोलिसांशी गाठ पडते. त्यानंतर जे घडतं ते पाहण्याजोगं आहे.