भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिने वाराणसीमधील सारनाथ येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमेंद्र हॉटेलमध्ये आकांक्षाने गळफास घेतला. ती २५ वर्षांची होती.
काल २५ मार्चला शूटनंतर ती हॉटेलात गेली आणि तिथेच तिने गळफास घेत आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येच्या बातमीने भोजपुरी इंडस्ट्रीत खळबळ माजली. आता या प्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्ये अगोदर इस्टाग्रामवर लाईव्ह केले होते, यात ती ढसाढसा रडली असल्याचे दिसत आहे.
आकांक्षा दुबेने हे असे पाऊल का उचलले या प्रकरणी चर्चा सुरू आहेत. पण हे मोठं पाऊल उचलण्याआधी आकांक्षा दुबेला काहीतरी सांगायचं होतं. असं सोशल मीडिया यूजर्स म्हणत आहेत. मृत्यूच्या काही तास आधी आकांक्षा दुबे इंस्टाग्रामवर लाईव्ह आली होती. आकांक्षाच्या आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती निराश असल्याचे दिसत आहे.
Akanksha Dubey : शॉकिंग! भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या, हॉटेलमध्ये घेतला गळफास
आकांक्षा दुबेने व्हिडीओमध्ये काहीही सांगितलेले नाही. व्हिडिओमध्ये ती रडताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी आकांक्षा दुबे कॅमेऱ्यापासून दूर जाते. त्यानंतर तिने हॉटेलच्या पंख्याला गळफास लावून जीवन संपवले. भोजपुरी अभिनेत्रीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृतदेहही ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा दुबे शुक्रवारी तिचे शूटिंग पूर्ण करून हॉटेलमध्ये पोहोचली होती. रविवारी सकाळी तिचा मृतदेह सापडला. मेक-अप मॅनने आकांक्षाला फोन केला तेव्हा तिने फोन उचलला नाही. त्यानंतर मेकअपमन थेट हॉटेलमध्ये पोहोचला. यावेळी ही घटना उघडकीस आली.