बांधकाम क्षेत्रात आपले नाव प्रस्थापित केल्यानंतर आता पुण्याच्या पुष्पगंगा व्हेंच्युअर्सने संगीत जगतात पदार्पण केले असून ‘पेहली गूंज’ हा आपला पहिला हिंदी गाण्यांचा अल्बम सादर केला आहे. या अल्बममधून नव्या प्रतिभाशाली तरुण गायकांना गाण्याची संधी दिली आहे. त्यातील दोन गायकांनी टीव्हीवरील ‘व्हॉईस इंडिया किड्स’ आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय संगीत कार्यक्रमात आपल्या यशस्वी कामगिरीने नाव व प्रसिद्धी मिळवली आहे.
याबाबत पुष्पगंगा व्हेंच्युअर्सचे व्यवस्थापकीय संचालक अम्मुल गोएल म्हणाले, “आम्ही असामान्य प्रतिभाशाली अशा तीन तरुण गायकांना सादर करत आहोत. त्यांची गाणी या अल्बमद्वारे सादर करुन आम्ही त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचे ठरवले आहे. यापुढची पायरी म्हणजे या गायकांच्या संगीत मैफलींचे देशभरातील सर्व प्रमुख शहरांत, तसेच परदेशांतही आयोजन करणे. यामध्ये पुणे, मुंबई, बंगळुरू, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा, नागपूर, चंडीगड व जयपूर या प्रमुख शहरांचा समावेश असेल, जेथे हे तरुण आपली संगीता प्रतीची आकांक्षा पूर्ण करु शकतील.”‘पेहली गूंज’ अल्बमला अक्षता संब्याल, प्रशांत सिंग कलहंस व जसु खान मीर या तिघांनी स्वरसाज दिला आहे. अक्षता ही बंगळुरुची रहिवासी असून ती ‘व्हॉईस इंडिया किड्स’ स्पर्धेतील स्पर्धक आहे. तिच्या नादमधुर आवाजाने याआधीच ‘गुंजाइश’ या लघुपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात तरंग उमटवणे सुरू केले आहे. बॉलिवूडसाठी गाण्याचे तिचे स्वप्न आहे. तर प्रशांतने लोकप्रिय चित्रपटातील गाणी सादर करून याआधीच आपले राहते शहर लखनऊतील रसिकांचे मन जिंकले आहे. या होतकरु प्रतिभावान गायकालाही बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन करण्याची आकांक्षा आहे. जसु खान मीर या राजस्थानातील बासरीप्रेमी किशोराने वयाच्या पाचव्या वर्षी संगीत शिकण्यास सुरूवात केली असून ‘व्हॉइस इंडिया किड्स’ व ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या दोन्ही स्पर्धेत लोकप्रियता मिळवून भारतीय दूरचित्रवाणी जगतात याआधीच आपला ठसा उमटवला आहे.पेहली गूंज या आल्बममध्ये मैत्री, प्रेम, इमानदारी व देशभक्ती अशा विविध भावभावनांचा आविष्कार घडवणारी गाणी आहेत. हे गीतलेखन ‘बाजीराव मस्तानी’, ‘मेरी कोम’, ‘रेस २’ व अशा अनेक चित्रपटांचा प्रसिद्ध गीतकार प्रशांत इंगोले याने केले आहे. आल्बममधील पाच गाण्यांपैकी दोन गाण्यांचा व्हिडिओ आज सादर करण्यात आला. यातील ‘कुछ भी नही’ या गाण्याला श्रेयस पुराणिक याने संगीत दिले असून ‘यारा तेरी यारी’ या गाण्याला विक्रम माँट्रोज याने संगीत दिले आहे.