प्रयागराज येथे सुरु असलेला महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आहे. आज खिलाडी अक्षय कुमारनेही (Akshay Kumar) महाकुंभसाठी हजेरी लावली. सर्व भाविकांप्रमाणे त्यानेही शाही स्नान केलं. त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करत मनोभावे प्रार्थना केली. यावेळी त्याने योगी सरकारने केलेल्या व्यवस्थापनाचंही कौतुक केलं. शाही स्नान केल्यानंतरचा त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.
अक्षय कुमारप्रयागराजमध्ये आल्याचं कळताच त्याची एक झलक पाहण्यासाठी चांगलीच गर्दी जमली. महाकुंभच्या ठिकाणी त्रिवेणी संगमावर त्याने हजेरी लावत गंगेत डुबकी मारली. सूर्यदेवाला आणि गंगेला नमस्कार केला. पवित्र स्नान केलं. त्याला पाहण्यासाठी आजूबाजूला तुफान गर्दी झाली. एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत तो म्हणाला, "आज इथे येऊन खूप छान वाटलं. चांगली व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्री योगींचे आभार त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सोयी सुविधा दिल्या आहेत. मला आठवतंय याआधी जेव्हा कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता तेव्हा लोक पोटली घेऊन यायचे. यावेळी तर मोठमोठे लोक येत आहे. अंबानी, अदानी, मोठमोठे कलाकार सगळे येत आहेत. यावरुनच कळतं की महाकुंभमध्ये उत्तम व्यवस्था आहे. मी सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचेही त्यांनी दिलेल्या सेवेसाठी हात जोडून आभार मानतो."
महाकुंभ १३ जानेवारी २०२५ रोजी पौष पौर्णिमेपासून सुरु झाला होता. आता २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी याचा समाप्ती होणार आहे. यावेळी महाकुंभसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच इतर नेतेमंडळींचीनीही उपस्थिती होती. उद्योगपती मुकेश अंबानींनीही कुटुंबासह हजेरी लावली. अनेक लोकप्रिय कलाकारही यावेळी महाकुंभमध्ये सहभागी झाले. करोडो भाविकांनीही याचि देही याचि डोळा अनुभव घेतला.