भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्वात लोकप्रिय गेमिंग अॅप असलेल्या ‘पबजी’सह 118 चीनी अॅप्सवर बंदी घातली. विशेष म्हणजे, सरकारने ‘PUBG’वर बंदी घालताच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने ‘FAU-G’ ही गेमिंग अॅप लॉन्च करण्याची घोषणा केली. ‘पबजी’च्या धर्तीवरची ‘FAU-G’ ही अॅप पूर्णपणे स्वदेशी असल्याचे आणि यातील जवळपास सर्व फिचर ‘पबजी’सारखे असल्याचेही अक्षयने जाहीर केले.
अक्षय कुमारने ‘FAU-G’ या नव्या गेमचे पोस्टर लॉन्च करताच अनेकजण सुखावले. मात्र अनेकांना बॉलिवूडच्या खिलाडीने गेमिंग अॅप लॉन्च करण्याबद्दल दाखवलेली तत्परता चांगलीच खटकली. कोरोनाच्या या काळात ‘पबजी’सारखे गेमिंग अॅप नाही तर बेरोजगारांना नोक-या द्या, असे म्हणत अनेकांनी अक्षयला ट्रोल केले.
‘हमारे पास रोजगार कहां है सरजी जो की आत्मनिर्भर बने,’ असे एका युजरने यावर लिहिले. एका युजरने अक्षयला ‘नकली देशभक्त’ म्हटत ट्रोल केले आहे.
एका युजरने यानिमित्ताने अक्षयला ‘फेकू जी’ म्हणत त्याची खिल्ली उडवली.
‘बस कर भाई, मोदीजी ने इतना आत्मनिर्भर बना दिया है की क्या बोलूं,’ असे एका युजरने यावर लिहिले.
असे आहे ‘FAU-G’अक्षय कुमारच्या मेंटर्सशिप अंतर्गत हे अॅप बनवले जाईल. पबजीला टक्कर देणारा हा मल्टीप्लेअर अॅक्शन गेम असेल. पबजीच्याच पार्श्वभूमीवर बनवण्यात येणारे हे अॅप पूर्णपणे भारतीय असेल. या अॅपच्या माध्यमातून मिळणारी कमाईतील 20 टक्के रक्कम अक्षय कुमार सीमेवर लढणा-या जवानांसाठी ‘वीर ट्रस्ट ऑफ इंडिया’ला दिली जाणार आहे. ‘FAU-G’ पुढील महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा गेम गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअरवर उपलब्ध असेल.
पबजी व्यतिरिक्त लूडो ऑल स्टार आणि वर्ल्ड-लूडो सुपरस्टार या अॅपवरही बंदी घालण्यात आली आहे. यापूवीर्देखील केंद्र सरकारने गलवान घाटी सीमा वादानंतर चीनमधील 106 अॅप्सवर बंदी घातली होती. ज्यामध्ये टिकटॉक, वी-चॅट, यूसी ब्राउजर, यूसी न्यूज सारख्या व्हिडिओ अॅप्सचा समावेश आहे.