डेहराडून: अभिनेता अक्षय कुमार सध्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये आहे. यादरम्यान त्याने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची डेहराडून येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अक्षय कुमारने धामी यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. दोघांमध्ये बराचवेळ चर्चा झाली आणि चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेला एक प्रस्ताव अक्षय कुमारने तात्काळ स्वीकारला.
अक्षय आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यात झालेल्या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी अक्षय ने उत्तराखंडला शुटींगसाठी सर्वोत्तम ठिकाण असल्याचे म्हटले. भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी अक्षय कुमारला उत्तराखंडचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्याचा प्रस्ताव दिला. अक्षयनेही तो प्रस्ताव तात्काळ स्वीकारला. आता तो उत्तराखंडचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी केदारनाथची प्रत दिली
भेटीनंतर अक्षय कुमारला पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडची प्रसिद्ध पहाडी टोपी घातली. तसेच, केदारनाथ मंदिराची प्रतही भेट दिली. गेल्या अनेक दिवसांपासून मसुरीमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रकुलप्रीतही आहे. पुढील काही दिवस ते मसुरीमध्येच असणार आहेत.
14 फेब्रुवारीला मतदान
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यावेळी सर्व जागांवर 632 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी गढवाल विभागातील 41 जागांवर 391 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तर कुमाऊं विभागातील 29 जागांवर 241 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. राज्यात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे.