Join us

९०च्या दशकातील अक्षय कुमारची अभिनेत्री सांभाळते कोटींचा बिझनेस, तर एकेकाळी माधुरी दिक्षितची होती कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 8:00 AM

'जान तेरे नाम' या सिनेमानंतर फरहीन 1994 साली आलेल्या 'नजर के सामने' सिनेमामध्ये खिलाडी अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसली.

बॉलीवुडमध्ये ९०च्या दशकात अनेक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर झळकल्या. मात्र त्या काळी काही मोजक्याच अभिनेत्रींनी रसिकांवर मोहिनी घातली होती. त्यामुळे या प्रस्थापित अभिनेत्रींपुढे नवोदित अभिनेत्रींचा निभाव लागू शकला नाही. ९० च्या दशकात अशीच एक अभिनेत्री बॉलीवुडमध्ये आली. तिचे नाव होतं फरहीन. तिने 'जान तेरे नाम' या सिनेमातून बॉलीवुडमध्ये एंट्री मारली होती. फरहीनचे लूक्स हे धकधक गर्ल माधुरी दीक्षितसारखे असल्याचे  बोललं जाऊ लागलं. त्यामुळे तिच्या फॅन्सची संख्याही वाढली होती.

 

 'जान तेरे नाम' या सिनेमानंतर फरहीन 1994 साली आलेल्या 'नजर के सामने' सिनेमामध्ये खिलाडी अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसली. विशेष म्हणजे याआधी ती अक्षय कुमार स्टारर 'सैनिक' या सिनेमात त्याच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. मात्र १९९७ साली ती भारताचा माजी क्रिकेटर मनोज प्रभाकरसह चोरी चोरी चुपके चुपके रेशीमगाठीत अडकली. लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रीचं करिअर लग्नानंतर संपलं. तसंच फरहीनचे देखील करिअर लग्नानंतर संपले होते. 

म्हणूनच लग्नानंतर फरहीननं बॉलीवुडला बाय बाय केला आणि दिल्लीत स्थायिक झाली. काही काळानंतर फरहीनने बॉलीवुडमध्ये कमबॅकचा प्रयत्न केला. मात्र त्यात तिला यश आले नाही. जान तेरे नाम सिनेमाचे दिग्दर्शक बलराज साहनी विज यांनी याच सिनेमाच्या सिक्वेलसाठी फरहीनला विचारणा केली होती. मात्र तिने आईची भूमिका साकारण्यास नकार दिला. ऐन तारुण्यात आईची भूमिका करणार नसल्याचे सांगत फरहीनने ही ऑफर धुडकावली होती. बॉलीवुडचे दरवाजे बंद झाल्याचे पाहून फरहीनने बिझनेस करायचे ठरवले. 

दिल्लीत फरहीनने हर्बल स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा व्यवसाय सुरु केला आहे. नॅचरल हर्ब्स असे तिच्या कंपनीचे नाव आहे. १८ वर्षांआधी पती आणि माजी क्रिकेटर मनोज प्रभाकरच्या मदतीने तिने या कंपनीचा व्यवसाय वाढवला. फरहीन आता यशस्वी बिझनेसवुमन असून तिच्या या कंपनीची उलाढाल कोट्यवधीच्या घरात आहे.   

टॅग्स :माधुरी दिक्षितअक्षय कुमार