अक्षय कुमारच्या 'सरफिरा' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. आज संपूर्ण भारतात हा सिनेमा रिलीज झालाय. अक्षय कुमार, राधिका मदान, सीमा बिस्वास, परेश रावल या कलाकारांच्या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. 'सरफिरा'च्या ट्रेलरमध्ये जर बघितलं तर सिनेमात अनेक इमोशनल सीन्स बघायला मिळतात. अशाच एका इमोशनल सीन्समध्ये अक्षय कुमारच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. डायरेक्टर कट म्हणाले तरी अक्षय रडायचा थांबत नव्हता. असं काय घडलं नेमकं?
अक्षय कुमार वडिलांच्या आठवणीत झाला भावुक
'सरफिरा' च्या प्रमोशनदरम्यान अक्षयने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. 'सरफिरा'मधील सगळ्यात आव्हानात्मक सीन कोणता? असा प्रश्न अक्षयला विचारण्यात आला. त्यावेळी अक्षय म्हणाला, "सिनेमातील अनेक गोष्टींना मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात रिलेट करु शकत होतो. तरीही एक सीन प्रचंड आव्हानात्मक होता. जेव्हा सिनेमातली माझी व्यक्तिरेखा त्याच्या वडिलांना गमावते. वडिलांचं निधन झाल्यावर माझी व्यक्तिरेखा प्रचंड दुःखात जाते. या सीनला मी ग्लिसरीन न वापरता ढसाढसा रडलो. मी माझ्या खऱ्या भावना शूटींगवेळी वापरल्या आहेत. तुम्ही सिनेमात बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की मी खराखुरा रडलो आहे." या संपूर्ण प्रसंगाचं शूट करताना अक्षय त्याच्या वडिलांच्या निधनाचा प्रसंग आठवत भावुक झालेला दिसला.
डायरेक्टर कट म्हणाले तरीही अक्षयच्या डोळ्यात पाणी
अक्षय कुमार पुढे म्हणाला, "अनेकदा दिग्दर्शक सुधा कट बोलल्यानंतर अक्षय डोकं खाली करायचा. कारण त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. प्रचंड भावुक झाल्यावर पुन्हा त्यातून बाहेर येणं खूप कठीण होतं. त्यामुळे मी दिग्दर्शकाला मोठा शॉट चित्रित करण्याची विनंती केली. याशिवाय एकच सीन विविध अँगलमधून शूट करण्यासाठी वारंवार थांबावं लागायचं. तेव्हा मी सुधाला भावुक सीन्स मल्टीपल अँगलमधून एकाचवेळी शूट करण्याची विनंती केली." सरफिरा आज सगळीकडे रिलीज झालाय.