बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा कोरोना वॉरियर्सच्या मदतीसाठी पुढे आला आहे. होय, यावेळी अक्षयने मुंबई पोलिसांना एक अनमोल भेट दिली. त्याच्या या आगळ्यावेगळ्या भेटीने मुंबई पोलिसांची मोठी मदत होणार आहे. होय, अक्षयने मुंबई पोलिसांना 1000 सेन्सर बॅण्ड भेट म्हणून दिले आहेत. मनगटावर बांधायचे हे सेन्सर बॅण्ड वापरणारा मुंबई पोलिस पहिला विभाग ठरणार आहे.कोरोना संकटाच्या काळात मुंबई पोलिस रस्त्यावर दिवसरात्र पाहारा देत आहेत. अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मुंबई पोलिस अहोरात्र खपत आहेत. याकाळात शेकडो पोलिसांनाही कोरोनाने ग्रासले़ आणखी दुर्दैवी म्हणजे, काही पोलिस कोरोनामुळे शहिदही झालेत. अशा काळात मुंबई पोलिसांची सुरक्षा लक्षात घेत, अक्षय कुमारने त्यांच्यासाठी हे खास मनगटी हेल्थ बॅण्ड दिलेत.
कोरोनाच्या संकटकाळात अक्षय कुमार सातत्याने मदत करतोय. अगदी सुरुवातीला त्याने पीएम फंडात 25 कोटी रूपयांची मदत दिली. यानंतर डॉक्टर व आरोग्य कर्मचा-यांच्या पीपीई आणि रॅपिड टेस्ट किट खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेला तीन कोटी रुपयांची रक्कम दान केली. मुंबई पोलिसांनाही त्याने 2 कोटींची मदत दिली आहे. कोरोना वॉरियर्सला सलाम करत अक्षने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपीही बदलला आहे. याठिकाणी त्याने मुंबई पोलिसांचा लोगो लावला आहे.
हेल्थ बॅण्डने काय होईल मदत
या हेल्थ बॅण्डच्या मदतीने पोलिसांच्या शरीराचे तापमान तपासता येणार आहे. पोलिसांच्या शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके, रक्तदाब, कॅलरी या सगळ्या गोष्टी तपासता येणार आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वेळेआधीच लक्षात येईल. कोरोना संकटकाळात पोलिस यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. अशास्थितीत पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या काळजीपोटी अक्षयने मुंबई पोलिसांना हे बॅण्ड पुरविली आहेत.