बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या कामासोबतच उदार स्वभावासाठीही ओळखला जातो. आता अक्षयने ट्रान्सजेंडर्सला मदतीचा हात दिला आहे. होय, तामिळनाडूमधील चेन्नई शहरात पहिले ट्रान्सजेंडर शेल्टर होम तयार केले जात आहे. या शेल्टर होमसाठी अक्षयने दीड कोटी रुपये दान केले आहेत.‘लक्ष्मी बॉम्ब’चे दिग्दर्शक राघव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. सोबत त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार ट्रान्सजेंडर्ससोबत दिसत आहे.‘मित्र आणि चाहत्यांनो, मी तुमच्यासोबत एक आनंदाची गोष्ट शेअर करणार आहे. अक्षय कुमारने भारतातील पहिले ट्रान्सजेंडर होम तयार करण्यासाठी दीड कोटी रुपये दान केले आहेत,’, असे राघव यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
राघव लॉरेन्स हे गत 15 वर्षांपासून ‘लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्ट’ चालवत आहेत. याचा उल्लेख करत, राघव यांनी लिहिले,‘सर्वांना माहित आहे लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्ट शिक्षण, लहान मुलांसाठी घरे बांधणे आणि दिव्यांगासाठी काम करतो. आमच्या ट्रस्टला 15 वर्ष पूर्ण होत आहेत. आम्ही ट्रान्सजेंडर्ससाठी एक नवा प्रस्ताव मांडला आहे. त्यांच्यासाठी लवकरच एक शेल्टर होम तयार करणार आहोत. लक्ष्मी बॉम्बच्या शुटिंग दरम्यान अक्षयने या शेल्टर होमबद्दल ऐकले आणि या प्रोजेक्टबद्दल एकल्यानंतर तातडीने दीड कोटी रुपये दान करणार असल्याचे मला सांगितले. जे कुणी मदतीसाठी पुढे येतात त्यांना मी देवासारखा मानतो. त्यामुळे अक्षय कुमार माझ्यासाठी देवासमान आहे. मी त्याचेआभार मानतो.’
अक्षय लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब’ या सिनेमात दिसणर आहे. राघव लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा सिनेमा ‘कंचना 2’ या साऊथ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. यात अक्षय एका ट्रान्सजेंडर भूताची भूमिका साकारताना दिसणार आहे.