अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. या मोहीमेत आता अभिनेता अक्षय कुमारही सामील झाला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी अक्षयने दान दिले आहेत. खुद्द त्यानेच एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली. सोबत लोकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.अक्षयने 1 मिनिट 50 सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अयोध्येत आपल्या प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभारणीचे काम सुरु झालेय, याचा खूप आनंद आहे. आता योगदान देण्याची वेळ आपली आहे. मी सुरुवात केलीये, तुम्हीही या मोहिमेत सहभागी व्हा. जय सियाराम, असे लिहित त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
रामायणात सेतू बांधण्यासाठी श्रीरामांना आपल्यापरीने मदत करणारी खारूताईची कथा अक्षयने व्हिडीओत सांगितली आहे. रामसेतू बांधण्यासाठी चिमुकल्या खारूताईने, वानरांनी आपआपल्यापरीने योगदान दिले. आता राम मंदिर उभारण्यासाठी आपल्यापैकी काहींनी वानर बनूप, काहींनी खारूताई बनून आपआपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे आवाहन अक्षयने केले आहे.
दरम्यान, अक्षय कुमार 'राम सेतू' असे नाव असलेला सिनेमा देखील लवकरच घेऊन येणार आहे. यासाठी त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी मुंबईत चर्चा देखील केली होती. नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या दिवशीपासून म्हणजेच १५ जानेवारीपासून विहिंपचे कार्यकर्ते देशात घरोघरी जाऊन वर्गणी जमा करत आहेत. देशातील चार लाख गावांमध्ये जवळपास ११ कोटी कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याची विहिंपची मोहीम आहे. देशातील प्रत्येक जात, समाज आणि पंथाच्या नागरिकांचा देशातील या भव्य मंदिराला हातभार लागला पाहिजे, अशी यामागची संकल्पना आहे.देशातील नागरिकांकडून ऐच्छिक स्वरुपात वर्गणी जमा केली जाणार आहे. यासाठी १०, १०० आणि १००० रुपयांचे कूपन तयार करण्यात आले आहेत.