बॉलिवूडमध्ये काही वर्षांपर्यंत केवळ तीन खानांची चलती होती. आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांचे चित्रपट म्हटले की ते बॉक्स ऑफिसवर हिट ठरणारच असे म्हटले जात होते. पण या तिघांना गेल्या काही वर्षांपासून एक अभिनेता चांगलाच टक्कर देत आहे. आता तर हा अभिनेता सलमान, शाहरुख आणि आमिरपेक्षा देखील जास्त मानधन घेतो. हा अभिनेता दुसरा कोणी नसून प्रेक्षकांचा लाडका अक्षय कुमार आहे.
मीडियम डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार हा सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. अक्षय एका चित्रपटासाठी जवळजवळ १२८ इतके मानधन घेतो. त्याने आजवर खिलाडी, हेराफेरी, हाऊसफुल, रुस्तम, हॉलिडे यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचा लक्ष्मी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याचे सूर्यवंशी, बच्चन पांडे हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. त्याने आजवर वाँटेड, दबंग, एक था टायगर यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सलमान एका चित्रपटासाठी १०५ कोटी रुपये घेतो. यावर्षी त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी पुढील वर्षी त्याचा राधे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, दिल तो पागल है, मोहोब्बते, कल हो ना हो यांसारख्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले आहे. पण झिरो हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तो गेल्या दोन वर्षांत कोणत्याच चित्रपटात झळकला नाहीये. आता त्याचा पठाण हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख एका चित्रपटासाठी ८८ कोटी इतके मानधन घेतो.
आमिर खानला बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. त्याच्या पीके, सरफरोश, थ्री इडियट यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. शाहरुख एका चित्रपटात काम करण्यासाठी ७४ कोटी रुपये घेतो. त्याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हृतिक रोशनने कहो ना प्यार है या चित्रटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या पहिल्याच चित्रपटामुळे तो स्टार झाला. आजवर त्याने क्रिश, जोधा अकबर सारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तो एका चित्रपटासाठी ६५ कोटी रुपये घेतो. त्याच्या सुपर ३० आणि वॉर या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले यश मिळाले.