Akshay Kumar-Vivek Mushran fight: ‘सौदागर’ या चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार झालेला अभिनेता विवेक मुशरानचं स्टारडम कधीच संपलंय. त्याच्या वयाचे अनेक अभिनेते आजही चित्रपटात लीड रोल साकारत आहेत. पण विवेक अधूनमधून कधी वडिलांच्या तर कधी साईड रोलमध्ये दिसतो तेवढाच. आज विवेक आठवण्याचं कारण म्हणजे, 31 वर्षांपूर्वीचं भांडण. होय, या भांडणामुळे बॉलिवूडचा एक सिनेमा कायमचा थंडबस्त्यात गेला. हे भांडण होत अक्षय कुमार (Akshay Kumar) व विवेक मुशरान (Vivek Mushran) यांचं. काय होतं या भांडणाचं कारण, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
निर्माता हरीश शाह यांनी आपल्या Tryst With Films या पुस्तकात या भांडणाचा उल्लेख केला आहे. 1991 साली अक्षय कुमारचा ‘सौगंध’ हा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. तर विवेक मुशरानचा ‘सौदागर’ हा डेब्यू सिनेमा रिलीजच्या प्रतीक्षेत होता. त्याआधीच हरीश शाह यांनी आपल्या एका सिनेमासाठी विवेक मुशरानला मनीषा कोईरालाच्या अपोझिट साईन केलं होतं. पॅरलल लीडच्या भूमिकेत अक्षय कुमार होता. पण अक्षय क्रेडिटवर अडला आणि हा सिनेमा कधीच बनला नाही.
अखेर चित्रपट सोडला...अक्षयचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता आणि विवेक मुशरानचा रिलीज होणार होता. त्यामुळे क्रेडिट लिस्टमध्ये विवेकआधी आपलं नाव असावं, असं अक्षयची इच्छा होती. पण विवेक यासाठी राजी नव्हता. हरीश शाह यांनी अक्षयला समजवण्याचे अनेक प्रयत्न केले. क्रेडिटचा मुद्दा करू नकोस, अशी विनंती केली. पण अक्षय मानला नाही. विवेकही मागे हटायला राजी नव्हता. अखेर अक्षयनं या सिनेमातून अंग काढून घेतलं. त्याने थेट सिनेमाला नकार कळवला.
अक्षयने सिनेमा सोडल्यावर हरीश शाह शाहरूख खानकडे गेलेत. कारण आधी त्याने या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी दिलीप कुमार यांनी ‘कलिंग’ नामक सिनेमाची घोषणा केली व यासाठी शाहरूखला साईन केल्याचं जाहिर केलं. यामुळे शाहरूखने ऐनवेळी हरीश शाह यांना नकार कळवला. शाहरूखच्या नकारानंतर हरीश शाह सलमान खानकडे गेले. पण मैंने प्यार किया या चित्रपटानंतर सलमान मोठा स्टार झाला होता. आधी पूर्ण स्क्रिप्ट तयार करा आणि मग सांगा, असं म्हणून त्यानेही हरीश शाह यांचा सिनेमा नाकारला. पण ना या चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाली, ना हा सिनेमा पूर्ण झाला. एक सिनेमा रखडला तो रखडलाच.