...म्हणून अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ लांबणीवर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 02:20 PM2020-07-12T14:20:18+5:302020-07-12T14:30:28+5:30
जास्त गर्दीच्या चित्रपटांची शूटिंग सध्यातरी लवकर सुरु होणार नाहीय. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाविषयी अशी चर्चा आहे की, निर्मात्यांनी या चित्रपटाची उर्वरित शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
-रवींद्र मोरे
कोरोना व्हायरसच्या कारणाने लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारतर्फे आता हळूहळू सूट देण्यात येत आहे. त्यामुळे सिनेस्टार आणि कर्मचारी आपापल्या कामावर वापस येताना दिसत आहेत. टीव्ही मालिकांनी तर आपली शूटिंग अगोदरपासूनच सुरु केली आहे, आता चित्रपटांच्या कलाकारांनीही काही प्रमाणात शूटिंग सुरु केली आहे. तसे तर जास्त गर्दीच्या चित्रपटांची शूटिंग सध्यातरी लवकर सुरु होणार नाहीय. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाविषयी अशी चर्चा आहे की, निर्मात्यांनी या चित्रपटाची उर्वरित शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
* या कारणाने शूटिंग सुरु होणार उशिरा
अक्षयचा हा चित्रपट पीरियड ड्रामा चित्रपट आहे, ज्याच्या वॉर सीक्वेन्समध्ये एका जागेवर शेकडो लोकांना एकत्र यावे लागणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाचे निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी या चित्रपटासोबत कोणतीही तडजोड करु इच्छित नाही. यासाठी त्यांनी या चित्रपटाची शूटिंग थोड्या उशिराने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
* लंडनहून आल्यावर पृथ्वीराजची होणार शूटिंग
‘पृथ्वीराज’ची सुमारे ४० दिवसांची शूटिंग बाकी आहे, जी अगोदर जयपुरमध्ये केली जाणार होती. मात्र सद्यस्थिती पाहता आता या चित्रपटाची शूटिंग मुंबईमध्येच पूर्ण केली जाणार आहे. अक्षय पुढील महिन्यात ब्रिटनमध्ये त्याचा ‘बेलबॉटम’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणार आहे. तेथून परत भारतात आल्यानंतर अक्षय ‘पृथ्वीराज’च्या सेटवर दिसणार आहे.
* इतर कलाकारांनीही केली शूटिंगला सुरुवात
लॉकडाउननंतर सर्वप्रथम अक्षय कुमारनेच एका जाहिरातीच्या शूटिंगची सुरुवात केली होती. सिनेइंडस्ट्रीचे बाकी दिग्गज कलाकार जसे विद्या बालन, तापसी पन्नू आणि अर्जुन कपूर यांनीदेखील आपली सुरुवात केली आहे. अर्जुननेही एका जाहिरातीची शूटिंग करुन सुरुवात ेकेली आहे.
* काळजी घेत आपापले काम सुरु करावे
या दरम्यान अक्षय कुमार म्हटला की, ‘मला वाटते की, आम्हाला सर्वांना अशाच प्रकारे आपले आयुष्य हळूहळू पुर्वरत असे सुरु करायला हवे. परिस्थिती खूपच बदललेली आहे मात्र काम तर करायचेच आहे. सर्वांनीच आपला परिसर स्वस्थ आणि सुरक्षित ठेवा आणि आपापले काम सुरु करा. मी स्वत: चार महिन्यानंतर शूटिंग सुरु करत आहे.’
* शासनाच्या मार्गदर्शक सुचनांना देतायत प्राधान्य
अनलॉकडाऊनमध्ये प्रत्येक क्षेत्र हळूहळू खुले होत असून तब्बल अडीच लाख लोकांचा कोरोना विमा उतरवून मनोरंजन क्षेत्रानेही पुन:श्च हरिओम केले आहे. लाईट... कॅमेरा... अॅक्शन... म्हणत नियमांचे पालन करत टीव्ही मालिका आणि सिनेमांची शूटिंग सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शूटिंग सुरू करण्याबाबत जीआर निघाल्यानंतर आरोग्य विभागाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसारच शूटिंग करण्यात यावी असे त्यात म्हटले आहे.