Join us

उत्तर प्रदेशात 'सम्राट पृथ्वीराज' टॅक्स फ्री; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 4:14 PM

Samrat prithviraj: गुरुवारी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातील काही नेत्यांसह 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट पाहिला. या स्पेशल स्क्रिनिंगच्यावेळी चित्रपट दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, अक्षय कुमार, मानुषी छिल्लर उपस्थित होते.

गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) याचा 'सम्राट पृथ्वीराज' (samrat prithviraj) हा चित्रपट अडचणींचा सामना करत आहे. मात्र, अनेक संकट पार केल्यानंतर या चित्रपटासाठी आणि संपूर्ण टीमसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( cm yogi adityanath) यांनी घोषणा केली.

गुरुवारी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातील काही नेत्यांसह 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट पाहिला. या स्पेशल स्क्रिनिंगच्यावेळी चित्रपट दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, अक्षय कुमार, मानुषी छिल्लर उपस्थित होते. यावेळी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यासोबतच त्यांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. सम्राट पृथ्वीराजपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री केली होता.

"मी कानपूरमध्ये असताना मंत्री राकेश सचान यांनी मला एक प्रश्न विचारला. आज तुम्ही पहिल्यांदाच आम्हाला तुमच्यासोबत चित्रपट पाहायला घेऊन जात आहात. त्यांचा हा प्रश्न ऐकल्यावर. मला खात्री आहे हा चित्रपट नक्कीच चांगला असेल आणि मनोरंजनासह यात इतिहासही आहे त्यामुळे कुटुंबासोबत हा चित्रपट पाहण्यासारखा आहे, असं उत्तर मी त्यांना दिलं. भूतकाळात झालेल्या चुकांमधून धडा घेत कोणत्या चुकांची पुनरावृत्ती करायची नाही हे या चित्रपटाने आम्हाला शिकवलं", असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "भूतकाळात अशा काही चुका घडल्या ज्यातून आपण शिकत शिकत आज स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करत आहोत. ७५ वर्षांचा हा कालावधी आपल्या प्रत्येकासाठीच मनन आणि आत्मचिंतन करण्यासाठीचा काळ आहे. येत्या २५ वर्षात आपल्या देशाला कोणत्या स्तरावर घेऊन जायचंय याची तयारी आतापासूनच आपण केली पाहिजे."

सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात त्यांनी देशासाठी केलेलं कार्य, त्यांचं बलिदान याविषयी भाष्य करण्यात येणार आहे. हा चित्रपट येत्या ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार, मानुषी छिल्लर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात संजय दत्त, सोनू सूददेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.दरम्यान, उत्तर प्रदेशात चित्रीकरण झालेल्या आणि स्थानिक कलाकारांना चित्रपटात संधी दिल्यास उत्तर प्रदेश सरकारकडून चित्रपट निर्मात्यांना सबसिडी दिली जाते. तसंच राष्ट्रीय महत्त्व सांगणारे चित्रपट टॅक्स फ्रीदेखील केले जातात. 

टॅग्स :पृथ्‍वीराजअक्षय कुमारयोगी आदित्यनाथबॉलिवूडसिनेमा