ठळक मुद्देअक्षयने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
अक्षय कुमार हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. अक्षयचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवतो. अक्कीचा प्रत्येक चित्रपट पैसा वसूल ठरतो म्हटल्यावर साहजिकच निर्माते-दिग्दर्शक त्याला घ्यायला उत्सूक असतात. आता इतकी डिमांड म्हटल्यावर भावही वाढणारच. होय, ताजे वृत्त खरे मानाल तर अक्षयने आपली फी वाढवली आहे. आता आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी तो 54 कोटी फी घेतो. आत्तापर्यंत तो प्रत्येक चित्रपटासाठी 27 कोटी फी घ्यायचा. ऐकून आश्चर्य वाटेल, पण फीची रक्कम थेट 27 कोटीवरून दुप्पट करण्यामागे नंबर गेम आहे. होय, याचे कारण आहे 9 हा आकडा.
डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय 9 हा नंबर त्याच्यासाठी लकी असल्याचे मानतो. त्यामुळे मानधनही तो त्यानुसार घेतो. ‘राऊडी राठोड’ या चित्रपटासाठी अक्षयने 27 कोटी रूपये (2 + 7=9) फी घेतली होती. ते वर्ष होते 2012. आता अक्षयने फी वाढवून 54 कोटी (5 + 4 =9) केली आहे. आता हा नंबर गेम तुमच्या लक्षात आला असेलच.
अक्षयने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. फोर्ब्स मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. बॉलिवूडच्या तिन्ही खानांना मात देत अक्षयने या यादीत 33 वे स्थान मिळवले आहे. अक्षयसोबत या यादीत रिहाना, स्कारलेट जॉन्सन, क्रिस इवन्स, केटी पेरी, ब्रेडली कूपर, जॅकी चॅन आणि लेडी गागा या हॉलिवूड स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. गतवर्षी या यादीत 40.5 मिलियन डॉलरची कमाईसह अक्षय 76 व्या स्थानावर होता. यावर्षी त्याने 33 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो मिशन मंगल आणि सूर्यवंशी या चित्रपटात बिझी आहे. याशिवाय साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘कंचना’चा हिंदी रिमेक ‘लक्ष्मी बॉम्ब’मध्येही त्याची वर्णी लागली आहे. ‘गुड न्यूज’ आणि ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटातही तो झळकणार आहे. काही तासांपूर्वी ‘मिशन मंगल’चा टीजर प्रदर्शित झाला. येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत.