लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हिंदी चित्रपसृष्टीचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षयकुमार आता पुन्हा एकदा ‘भारतीय नागरिक’ झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर मंगळवारी अक्षयकुमारने ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली. नव्वदच्या दशकात सलग १५ चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आटपल्यानंतर कारकीर्द धोक्यात आल्याने अक्षयने कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले होते. मात्र, नंतरच्या काळात अक्षयने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. परंतु आपले कॅनेडियन नागरिकत्व अक्षयने त्यागले नव्हते. त्यामुळे त्याला सातत्याने टीकेला सामोरे जावे लागत होते.
या सर्व पार्श्वभूमीवर अक्षयकुमारने भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता. स्वातंत्र्यदिनी त्याला नागरिकत्व बहाल करण्यात आले. भारतीय नागरिकत्व दिल्याच्या प्रमाणपत्राचे छायाचित्र आणि त्याखाली ‘दिल और सिटीझनशिप दोनो हिंदुस्तानी. जय हिंद’ अशी फोटोओळ देत अक्षयने ही आनंदवार्ता चाहत्यांना दिली.