बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे (Akshay Kumar ) सिनेमे दणकून आपटत आहेत. या वर्षात रिलीज झालेले त्याचे सलग चार सिनेमे फ्लॉप गेलेत. बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन या अक्कीच्या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. ‘राम सेतू’ हा सिनेमाही फ्लॉपच्याच रांगेत जाऊन बसला. अगदी ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘कठपुतली’ हा सिनेमाही लोकांना फार काही आवडला नाही. अक्षय कुमारने आता ‘मंथन’ करण्याची गरज असल्याचं अनेकांचं मत पडलं आहे. अक्षय धडाधड सिनेमे साईन करतो, 40-45 दिवसांत अक्षय सिनेमो हातावेगळा करतो, त्याच्या या कामाच्या पद्धतीवरही टीका होऊ लागली आहे. अलीकडे बोनी कपूर यांनी अक्षयला यावरून जोरदार टोला लगावला होता. ‘कॅनडा कुमार’ म्हणून ट्रोल करणारे तर आहेतच. पण अक्षयचं म्हणाल तर त्याला आता या सगळ्याचा कंटाळा येऊ लागला आहे. तो वैतागला आहे. अलीकडे त्याने हा वैताग बोलून दाखवला.
तू लवकर का झोपतोस? असं ते मला विचारता....‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशीप समीट 2022’ या कार्यक्रमात संवाद साधतांना अक्षय यावर बोलला. ‘बाबा तू एवढं काम का करतोस, असं पालक आपल्या मुलांना कधी विचारतात का? एखादी वाईट सवय असेल तर प्रश्न विचारणं योग्य आहे. एखादी व्यक्ति जुगार खेळत असेल किंवा दारू पिऊन झिंगत असेल तर अशा व्यक्तीला प्रश्न करणं योग्य आहे. पण मन लावून जास्त काम करणाऱ्या व्यक्तीला कुणी हा प्रश्न विचारावा? होय, मी वर्षाला चार चित्रपट करतो, मी जाहिराती करतो, पण मी हे काम कोणापासून हिरावून घेऊन तर करत नाही ना? तुम्ही लवकर का उठता? असा प्रश्न मला पत्रकार का विचारतात, हेच मला कळत नाही. पहाटेची वेळ ही उठण्यासाठीच असते. तू लवकर का झोपतोस?, असं ते मला विचारता. अरे मूर्खांनो रात्री माणूस झोपतोच. मी काय चुकीचं करतोय, हेच मला कळत नाही. काम करायला कोणाला आवडणार नाही? मी वर्षाला 4 चित्रपट करणार, गरज असेल तर त्यासाठी मी 50 दिवस मी ददेईन किंवा अगदीच अत्यावश्यक असेल तर मी 90 दिवसही द्यायला तयार आहे. मी 40 दिवसांत सिनेमा पूर्ण करतो, याचा लोकांनी चुकीचा अर्थ काढला आहे,’ असं अक्षय म्हणाला.
मला माफ करा...‘हेरा फेरी 3’मध्ये तू का नाहीस? असा प्रश्न यावेळी अक्षयला केला गेला. यावर तो म्हणाला, ‘हेरा फेरी हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. मला खूप वाईट वाटते की तो पुन्हा तयार होण्यासाठी इतका वेळ गेला. पण मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. यावेळी मी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर खूश नव्हतो, म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी ते करू शकत नाही याचे मला खूप दु:ख आहे, परंतु सर्जनशीलतेमुळे मी आता या चित्रपटाचा भाग नाही. मी सोशल मीडियावर पाहिलं की लोक ‘नो राजू, नो हेरा फेरी’ म्हणत आहेत. लोकांचं हे प्रेम पाहून मला स्वत:ला खूप वाईट वाटल. मी ‘हेरा फेरी 3’ चा भाग होऊ शकलो नाही याबद्दल मी माझ्या चाहत्यांची माफी मागतो. मला माफ करा....
माझी फी 30 ते 40 टक्के कमी करावी लागेल...बॉलीवूड चित्रपटांच्या अपयशावर अक्षय बोलला. तो म्हणाला, ‘मला वाटतं आता प्रेक्षकांना काहीतरी वेगळं हवं आहे आणि आपण यावर विचार केला पाहिजे. आपण प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणू शकलो नाही ही आपली चूक आहे. यात प्रेक्षकांचा काही दोष नाही. अर्था सिनेमा फ्लॉप होणं ही केवळ एकट्या अभिनेत्याची चूक नाही. यामागे अनेक कारणं असतात. पण हो, अशास्थितीत कलाकारांना निर्माता आणि थिएटर मालकांबद्दल विचार करायला हवा. व्यक्तिश: मला आता माझी फी 30 ते 40 टक्के कमी करावी लागेल. आता मला स्वत:ला नवीन सुरुवात करायची आहे. मला काहीतरी वेगळे दाखवायचं आहे.