कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे अख्खा देश ठप्प आहे़ वाहतूक, उद्योग सगळेच बंद आहे. मनोरंजन उद्योगालाही याचा जोरदार फटका बसला आहे. शूटींग बंद शिवाय रिलीजही बंद असल्यामुळे लॉकडाऊनमुळे अनेक आगामी चित्रपट धोक्यात आले आहेत. निर्मात्यांना कोट्यवधींचा फटका बसला आहे. शिवाय लॉकडाऊन आणखी वाढलेच तर काय? असा प्रश्नही निर्मात्यांपुढे आ वासून उभा आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर काही बिग बजेट सिनेमे थेट प्रेक्षकांच्या मोबाईलवर रिलीज करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. होय, ओटीटीवर चित्रपट रिलीज करण्याचा एक पर्याय सद्यस्थितीत निर्मात्यांना खुणावू लागला आहे. असे झालेच तर लॉकडाऊमुळे रखडलेले अनेक सिनेमे ओटीटीवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत.
अशी आहे चर्चालॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद आहेत. साहजिकच गेल्या दीड महिन्यांत एकही नवा सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. लॉकडाऊन वाढलेच तर रिलीजसाठी तयार असलेल्या सिनेमांचे भवितव्य आणखी धोक्यात येणार आहे. लॉकडाऊन उठलेच तर प्रेक्षक पुन्हा पूर्वीसारखे चित्रपटगृहांत गर्दी करतील का? या प्रश्नाचा विचार केला तर स्थिती पूर्वपदावर यायला आणखी बराच काळ जावा लागणार आहे. या सगळ्यांवर तोडगा किंवा पर्याय म्हणून ओटीटीवर चित्रपट रिलीज करण्याचा विचार बॉलिवूडमधील काही दिग्गज निर्मात्यांनी सुरु केल्याची चर्चा आहे. गेल्या दीड महिन्यांत टेलिव्हीजनसोबत डिजिटल व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा घेणा-या ग्राहकांची संख्या प्रचंड वाढली आहे. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, जी-5 च्या ग्राहकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आपल्या ग्राहकांच्या संख्येत आणखी वाढ करण्याच्या महत्त्वाकांक्षेने आता हे सगळेजण बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांना देऊ इच्छित आहे. म्हणजे चित्रपटगृहांआधी या ओटीटीवर बिग बजेट सिनेमे रिलीज करण्याची त्यांची इच्छा आहे. यासाठी या चित्रपटांचे हक्क विकत घेण्यासाठी शंभर कोटींपेक्षा अधिकची बोली लावण्यासही हे ओटीटीवाले तयार आहेत.
रणवीरचा 83, अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब?रणवीर सिंगचा 83 हा सिनेमा बनून तयार आहे. अक्षय कुमारचालक्ष्मी बॉम्बही या ईदला रिलीज होणार होता. पण लॉकडाऊनमुळे या दोन्ही बिग बजेट सिनेमांचे रिलीज पुढे ढकण्यात आले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमांच्या रिलीजवरही प्रश्नचिन्ह लागले आहे. चर्चा खरी मानाल तर आता हे सिनेमे ओटीटीवर रिलीज करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. 83 या सिनेमासाठी तर 100 कोटींची बोली लागल्याचे मानले जात आहे. ओटीटीवाल्यांची नजर लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटावरही आहे. अद्याप या दोन्ही सिनेमांच्या मेकर्सनी या चर्चेला अधिकृत दुजोरा दिलेला नाही़ पण चर्चा तर तीच आहे.