Join us

अक्षय कुमारने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, अर्धा तास झाली चर्चा; उत्तर प्रदेशला येण्याचे दिले आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 12:42 PM

योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमार यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. सिनेमा, उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेला फिल्म सिटी प्रकल्प हे चर्चेचे विषय होते

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे मुंबई दौऱ्यावर आहेत. योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये उद्योग वाढावेत, फिल्म सिटी तयार व्हावी, हा मुख्य उद्देश या दौऱ्याचा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमारने (Akshay Kumar) योगी आदित्यानाथ यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अर्धा तास झाली चर्चा

योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमार यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. सिनेमा, उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेला फिल्म सिटी प्रकल्प (UP Film City Project) हे चर्चेचे विषय होते. अक्षय कुमारने योगींना त्याचा सिनेमा रामसेतू नक्की पाहा असे सांगितले. तसेच उत्तर प्रदेशच्या फिल्म सिटी प्रकल्पाबाबत भारतीय सिनेमा जगतात खूप उत्साह असल्याचे सांगितले. अनेक मोठे प्रोडक्शन हाऊस, निर्माते या प्रकल्पाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

अक्षय कुमार म्हणाला, 'उत्तर प्रदेशातील जागतिक स्तरावरील फिल्म अॅंड इन्फोटेन्मेट सिटीचा विकास सिनेमा जगताला उच्च स्तरावर नेऊन पोहोचवेल. रामसेतू सिनेमा बनवण्यासाठी केलेले संशोधन, तयारी, शास्त्रीय कारणं यासंबंधी योगीजींसह चर्चा केली. '

योगी आदित्यनाथ म्हणाले, 'जनजागृती करण्यासाठी चित्रपट महत्वाची भूमिका बजावतात. चित्रपट निर्मात्यांनी विषय निवडताना सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर भर दिला पाहिजे. उत्तर प्रदेशात चित्रपटांसंबंधी नवी नीती देखील बनवली जात आहे.' योगी यांनी अक्षय कुमारला उत्तर प्रदेशमध्ये येण्याचे आमंत्रणही दिले.

अक्षय कुमार आगामी 'सेल्फी' (Selfiee) यहा सिनेमा येणार आहे. यामध्ये इम्रान हाश्मी (Emran Hashmi) आणि नुसरत भरुचा (Nusrat Bharucha) यांच्याही भूमिका आहेत. फेब्रुवारी महिन्यात सिनेमा रिलीज होणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढावी, अच्छे दिन यावे यासाठी योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा आयोजित केल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :योगी आदित्यनाथअक्षय कुमारउत्तर प्रदेशमुंबईसिनेमा