Akshay Kumar At Haji Ali: गेल्या २० वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अक्षय कुमार हा त्याचा चित्रपटांसाठी आणि सढळ हाताने मदत करण्यासाठी ओळखला जातो. अक्षय कुमार हा बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असला तरी तो भरपूर दानधर्मही करतो. अक्षय कुमारने वेळोवेळी सामाजिक क्षेत्रांमध्ये मदतीचा हातभार लावला आहे. सामाजिक क्षेत्रांप्रमाणे आता अक्षय कुमार धार्मिक क्षेत्रांमध्येही मदतीचा हातभार लावताना दिसत आहे. आधी मुंबईच्या रस्त्यावर लोकांसाठी जेवण देणाऱ्या अक्षय कुमारने आणखी एक मोठी मदत केली आहे.
अक्षय कुमार हा नुकताच मुंबईतील हाजी अली दर्ग्यात पोहोचला होता जिथे त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एवढेच नाही तर त्याने दर्ग्याच्या नूतनीकरणाच्या कामासाठी कोट्यवधी रुपये दिले आहेत. यापूर्वी अक्षय मुंबईच्या रस्त्यावर भंडारा घालताना दिसला होता. तो रस्त्यावरच्या लोकांना जेवण देत होता. हे सगळं करत असताना त्याने मास्क घालून चेहरा लपवला होता. अक्षयच्या या कामाबद्दल चाहते त्याचे कौतुक करत आहेत. अशातच त्याने हाजी अली दर्ग्यासाठी मोठी मदत केली आहे.
सध्या हाजी अली दर्ग्यात नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत अक्षय कसा मागे राहील? अक्षयने यासाठी कोट्यवधी रुपयांची देणगी दिली आहे, ज्यानंतर दर्गा ट्रस्ट टीम खूप आनंदी आहे. अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्याच्या नुतनीकरणाच्या कामासाठी तब्बल एक कोटी २१ लाखांची मदत केली आहे. हाजी अली दर्ग्याच्या नुतनीकरणाची जबाबदारी अक्षय कुमारने स्विकारली आहे. अक्षय कुमार हा त्याच्या आगामी चित्रपट 'खेल खेल मैं'च्या निमित्ताने मुंबईच्या हजी आली दर्गा येथे पोहचला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करावी या उद्देशाने अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटातील सहकलाकारांसोबत प्रार्थना करण्यासाठी आला होता.
अक्षय कुमारने केलेल्या मदतीबाबत दर्ग्याच्या ट्रस्ट व्यवस्थापनाने अभिनेत्याचे आभार मानले आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, अक्षय कुमारने दानधर्म करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी राम मंदिराच्या उभारणीदरम्यान अक्षयने ३ कोटी रुपयांची देणगी दिली होती. अक्षय कुमार राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. त्या दिवसांत तो त्याच्या बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता.