Join us

Akshay Kumar : चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे कॅनडात शिफ्ट होणार होता अक्षय कुमार, मग का बदलला इरादा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 1:31 PM

Akshay Kumar On Canada Citizenship: ट्रोलर्स अक्षयला सर्रास ‘कॅनडा कुमार’ म्हणून ट्रोल करतात. याचं कारण म्हणजे, अक्षय कुमारकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. अलीकडे ‘कॉफी विद करण 7’मध्ये अक्षय कॅनडा नागरिकत्वाच्या मुद्यावर बोलला होता. आता एका मुलाखतीतही तो यावर बोलला.

 Akshay Kumar On Canada Citizenship: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा (Akshay Kumar ) ‘रक्षाबंधन’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाकडून अक्षयला मोठ्या अपेक्षा होत्या. पण बॉक्स ऑफिसवर चित्र वेगळं चित्र दिसतंय. चित्रपटाकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले आहेत. अक्षय कुमारबॉलिवूडचा मोठा स्टार आहे. त्याचे लाखो-करोडो चाहते आहेत. पण त्याला ट्रोल करणारेही कमी नाहीत. ट्रोलर्स अक्षयला सर्रास ‘कॅनडा कुमार’ म्हणून ट्रोल करतात. याचं कारण म्हणजे, अक्षय कुमारकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. अलीकडे ‘कॉफी विद करण 7’मध्ये अक्षय कॅनडा नागरिकत्वाच्या मुद्यावर बोलला होता. आता एका मुलाखतीतही तो यावर बोलला.‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने कॅनडाच्या नागरिकत्वाबद्दल एक मोठा खुलासा केला.

म्हणून विचार केला होता...काही वर्षांपूर्वी माझे सिनेमे चालत नव्हते. जवळपास 14-15 सिनेमे आपटले होते.  त्यामुळे आपली कारकीर्द आता संपली असून आता आयुष्य जगण्यासाठी आणखी काही वेगळं काम करावं लागणार असल्याचं मला वाटू लागलं होतं. माझा एक जवळचा मित्र कॅनडात राहतो. त्याने मला कॅनडात येण्यास सांगितलं. मला सुद्धा त्याचा सल्ला पटला. मी तिथे गेलो आणि नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि ते मिळालं सुद्धा. माझं बॉलिवूडमधील करिअर संपलं असं वाटल्यामुळे मी तो निर्णय घेतला  होता. पण सुदैवाने माझ्या 15 व्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.  भारतात पुन्हा यश मिळाल्यावर माझा विचार बदलला. मी आपल्या देशातच राहणार, असं मी ठरवलं. यानंतर मी पुन्हा कधीच तो विचार केला नाही. माझ्याकडे पासपोर्ट आहे. पासपोर्ट काय असतो? तर तो एका देशातून दुस-या देशात जाण्यासाठी असतो. मी अद्यापही भारतीय आहे. मी भारतात टॅक्स भरतो. माझ्याकडे कॅनडातही टॅक्स भरण्याचा पर्याय आहे. पण मी माझ्या देशात टॅक्स भरतो. अनेक लोक मला कॅनडा कुमार म्हणून ट्रोल करतात. बोलतात त्यांना बोलू द्या. मी फक्त एवढं म्हणेल की, मी माझ्या देशात मी काम करतो. मी एक भारतीय आहे आणि नेहमी भारतीय असेल..., असं अक्षय कुमार म्हणाला.

मला नेहमीच सिद्ध करावं लागतं...याआधी हिंदूस्तान टाइम्स लीडरशिप समीट 2019 दरम्यान अक्षय या मुद्यावर बोलला होता.  मी एक भारतीय आहे आणि प्रत्येकवेळा मला माझं भारतीयत्व सिद्ध करायला सांगितलं जातं, याचं दु:ख होतं, असं तो म्हणाला होता.

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड