खिलाडी कुमारचा नवा चित्रपट 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. 'ओएमजी २'नंतर अक्षय कुमारच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. परिणीती चोप्रा आणि अक्षय मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट २०२३मधील बहुचर्चित सिनेमांपैकी एक होता. अखेर शुक्रवारी (६ ऑक्टोबर) हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'मिशन रानीगंज' हा एक सत्य घटनेवर आधारित असलेला सिनेमा आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने रियल लाइफ हिरो जसवंत गिल यांची भूमिका साकारली आहे. पश्चिम बंगालमधील रानीगंज येथे कोळशाच्या खाणीत ६५ खाणकाम करणारे लोक अडकले होते. जसवंत गिल यांनी या ६५ लोकांचे प्राण वाचवले होते. तेव्हापासून ते कॅप्सूल गिल या नावाने ओळखले जाऊ लागले. सत्य घटनेवर आधारित असलेल्या 'मिशन रानीगंज'च्या बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडे समोर आले आहेत.
'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार 'मिशन रानीगंज'ने प्रदर्शनाच्या दिवशी २.८ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. आता या चित्रपटाच्या वीकेंड कलेक्शनकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ५५ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन जो टिनू सुरेश देसाई यांनी केलं आहे.
अक्षय कुमारच्या 'मिशन रानीगंज'बरोबरच 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपटही प्रदर्शित झाला. भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.