रुपेरी पडद्यावर ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले सिनेमा चांगलेच हिट ठरले आहेत. 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' अशा सिनेमांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. चित्रपटसृष्टीत आता आणखी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सिनेमांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अशाच एका सिनेमात खिलाडी अक्षय कुमार भूमिका साकारणार आहे. अक्षय रुपेरी पडद्यावर पृथ्वीराज चौहान ही ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं नाव ठरलं नसलं तरी अक्षयने या भूमिकेसाठी होकार दिल्याची माहिती मिळत आहे. पुढल्या वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार असून या वर्षअखेरपर्यंत शुटिंगला सुरूवात होणार असल्याचे बोललं जात आहे. 'केसरी' सिनेमानंतर अक्षयचा हा तिसरा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला सिनेमा असेल. ११९१ साली झालेल्या तराइन युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद गोरीचा पराभव केला होता.
पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावरील या ऐतिहासिक सिनेमात त्यांच्या पत्नी संयोगिता, मोहम्मद गोरी, गयासुद्दीन गजनी, जयचंद यांच्याही प्रमुख व्यक्तीरेखा असतील. या ऐतिहासिक सिनेमात ११४९ ते ११९२ चा काळ पुन्हा एकदा जिवंत करण्यात येईल. पृथ्वीराज चौहान यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सगळा प्रवास या सिनेमात दाखवला जाण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चौहान यांचा जन्म वर्ष ११६६ साली झाला होता. ते अजमेरचे महाराजा सोमेश्वर चौहान यांचे सुपुत्र होते. पृथ्वीराज चौहान यांना दिल्लीचे अखेरचे हिंदू राजा असंही म्हटलं जातं. अक्षयच्या आधी या भूमिकेसाठी रणवीर सिंहच्या नावाचीही चर्चा होती. मात्र आता अखेर अक्षयच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजतंय. २०१९ साली अक्षय कुमारचे पाच सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. यांत 'केसरी', 'मिशन मंगल', 'गुड न्यूज' आणि 'सूर्यवंशी' या सिनेमांचा समावेश आहे.