कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोणत्याही चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सध्या होत नाहीये. पण नुकतेच अक्षय कुमारला मुंबईतील एका स्टुडिओत शूट करताना पाहाण्यात आले. या शूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रीकरण ठप्प असताना अक्षय कुमार कसले चित्रीकरण करतो हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... पण अक्षयने कोणत्या चित्रपटासाठी नव्हे तर एका जाहिरातीसाठी चित्रीकरण केले. अक्षयने सोमवारी मुंबईतील कमालिस्तान स्टुडिओमध्ये लॉकडाऊननंतर लोकांच्या असलेल्या जबाबदाऱ्या या विषयावरील एका जाहिरातीचे चित्रीकरण केले. ही जाहिरात केंद्र सरकारच्या आरोग्य विभागासाठी चित्रीत केली गेली असून चित्रीकरण करताना सगळ्यांनी मास्क घातले होते. तसेच कोरोना व्हायरसचा कोणत्याही प्रकारे फैलाव होणार नाही याची काळजी चित्रीकरण करताना घेण्यात आली. या चित्रीकरणासाठी काही ठरावीक लोकच सेटवर उपस्थित होते. या जाहिरातीचे दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केले आहे.
आर. बाल्कीने पीटीआयला याविषयी माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्याला कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कशाप्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे हे या जाहिरातीमार्फत सांगण्यात आले आहे. जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी खूप कमी लोक होते आणि या चित्रीकरणाच्यावेळी अनेक नियम पाळण्यात आले. अशाचप्रकारे कमी लोकांच्या उपस्थितीत चित्रीकरण केले जाऊ शकते.