बॉलिवूड अभिनेता 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) अबूधाबीत बनलेल्या पहिल्या हिंदूमंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे. आजच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले. बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (BAPS) अबु मुरेखा या भागात मंदिर उभारले आहे. या भव्य मंदिराचं सर्वांनाच आकर्षण आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये हे पहिलंच हिंदू मंदिर उभारण्यात आलं आहे. अक्षय कुमारचा मंदिर परिसरातील व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.
फिकट रंगाचा कुर्ता, पायजमा या लूकमध्ये कडक सुरक्षाव्यवस्थेसह अक्षय कुमार मंदिरात जाताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आज या मंदिराचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं तेव्हा सर्वच भारतीयांना अभिमान वाटला. आता खिलाडीही तिथे पोहोचल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. अबुधाबीतील या मंदिर परिसरात जय श्री रामचा गजर होतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षय कुमारशिवाय विवेक ओबेरॉय, अभिनेते दिलीप जोशी सुद्धा अबुधाबीत दर्शनासाठी पोहोचले.
अयोध्या राम मंदिर उद्घाटनासाठी आमंत्रण असूनही अक्षय कुमार पोहोचू शकला नव्हता. त्यावेळी तो जॉर्डनमध्ये शूटिंग करत होता. मात्र आता अबुधाबीच्या या पहिल्या हिंदू मंदिरात त्याने आवर्जुन हजेरी लावली.
700 कोटी रुपये खर्चून बांधले BAPS हिंदू मंदिर
अबुधाबीचे BAPS स्वामीनारायण मंदिर 108 फूट उंच, 262 फूट लांब आणि 180 फूट रुंद आहे. ही तयार करण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंदिराच्या बांधकामात केवळ चुनखडी आणि संगमरवरी वापरण्यात आला आहे. मंदिराच्या बांधकामासाठी 700 कंटेनरमध्ये 20,000 टन पेक्षा जास्त दगड आणि संगमरवरी अबुधाबीला आणण्यात आले होते.