मणिपूर राज्यात दोन महिलांना निर्वस्त्र करुन त्यांची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मणिपूरमधील घटनेवर सेलिब्रिटींनी ट्वीट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही या घटनेबाबत ट्वीट केलं आहे.
“मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ पाहून मला धक्का बसला आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी, अशी मी आशा करतो. जेणेकरुन, पुन्हा कोणीही असे भयानक कृत्य करण्याचा विचारही करणार नाही,” असं म्हणत अक्षयने संताप व्यक्त केला आहे. अक्षय कुमारने मणिपूर घटनेबाबत केलेल्या या ट्वीटने सगळ्यांचा लक्ष वेधून घेतलं आहे.
मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?
मणिपूरमध्ये कुकी समुदायातील तीन महिलांची मैतेई समुदायातील लोकांकडून छेडछाड करण्यात आली होती. ४ मे रोजी त्यांना निर्वस्त्र करुन धिंड काढण्यात आली होती. घटनेच्या २१ दिवसांनंतर या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तीन महिलांना निर्वस्त्र करुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. यातील १९ वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. मणिपूरमधील या व्हायरल झालेल्या व्हिडिओची मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.