सोमवारी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgn) भारताच्या शूर जवानांसाठी ‘सिपाही’ नावाची एक कविता शेअर केली होती. ही कविता अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेली. अक्षय कुमार (Akshay Kumar) तर अजयने शेअर केलेल्या कवितेचा व्हिडीओ पाहून इतका भावुक झाला की, त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. अजयच्या या कवितेचा व्हिडीओ रिट्वीट करत अक्षयने त्याच्या भावना बोलून दाखवल्या. पण या भावना व्यक्त करताना अक्षय छोटीशी चूक करून बसला.
किस-किस बात पर दिल जीतोगे यार...अजयने शेअर केलेल्या कविताचा व्हिडीओ पाहून अक्षय कमालीचा इमोनशल झाला. भावनेच्या भरात त्याने एक भावुक ट्वीटही केले. ‘ख-या आयुष्यात भावना व्यक्त करण्याची वेळ येते, तेव्हा मी त्या व्यक्त करू शकत नाही. पण या कवितेने माझ्या डोळ्यांत पाणी आले. अजय देवगण, तुझ्या आत इतका चांगला कवी दडलेला आहे, हे मला ठाऊक नव्हते. किस किस बात पर दिल जीतोगे यार,’ असे भावुक ट्वीट अक्षयने केले. पण इथे जरा चूक झाली. होय, कारण ही कविता अजयने लिहिलेली नव्हतीच...
अजय नाही, मनोजची कविता...अक्षयच्या भावुक ट्वीटवर अजय देगवणने लगेच रिप्लाय दिला. ‘माझ्या कवित्वावर इतके सुंदर शब्द लिहिल्याबद्दल अक्षय तुझे आभार. असे कौतुक नेहमीच आवडते. पण या ‘सिपाही’ कवितेसाठी मनोज मुंतशीरला धन्यवाद देईल,’असे त्याने लिहिले. म्हणजेच काय, मी कविता लिहिली नसून ती मनोज मुंतशीरने लिहिल्याचे अजयने स्पष्ट केले. यानंतर अक्षयलाही त्याची चूक कळली आणि त्याने ती लगेच सुधारली. ‘ही शानदार कविता प्रतिभावान मनोज मुंतशीरने लिहिली आणि अजयने त्याला आवाज दिल्याचे आत्ताच कळले,’ असे त्याने लिहिले.