‘गुड न्यूज’ या हिंदी चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. वेगळा विषय आणि हटके स्टारकास्ट यांच्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. चित्रपटाचे कथानक, विषय, गाणी या सर्वांनीच प्रेक्षकांना भूरळ घातलीय. बॉलिवूडचा अक्की अर्थात अक्षयकुमार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्यासोबत मारलेल्या या गप्पा...
* तुला तुझ्या आयुष्यातील पहिली ‘गुड न्यूज’ केव्हा मिळाली?- माझ्या बहिणीचा जन्म झाला, ती माझ्यासाठी सर्वांत पहिली गुड न्यूज होती.
* राज मेहता हे नवे दिग्दर्शक असूनही तुला हा प्रोजेक्ट कसा स्विकारावा वाटला?- मला नेहमी नव्या दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडतं. मी जेव्हा जेव्हा नव्या दिग्दर्शकांसोबत काम केलं तेव्हा एक बाब माझ्या निदर्शनास आली. ती म्हणजे ते खूप जास्त महत्त्वाकांक्षी असतात, त्यांच्याकडे खूप नवनवे विषय असतात. ते समर्पण वृत्तीने या चित्रपटांना घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. राज हा माझा २१वा नवा दिग्दर्शक आहे, ज्याच्यासोबत मी काम केले.
* ‘गुड न्यूज’ सारख्या चित्रपटासाठी तुझा टार्गेट ऑडियन्स कोणता आहे?- महिला माझा टार्गेट ऑडियन्स, पण, मला वाटतं पुरूष सुद्धा. आयव्हीएफ प्रक्रिया ही खूपच प्रसिद्ध आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. ८ मिलीयन बालक ांचा जन्म या प्रणालीतून झाल्याचे समजतेय. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद खरंच उत्साहवर्धक आहे.
* आयव्हीएफसारख्या गंभीर विषयावर कॉमेडी चित्रपट बनवणं कितपत संयुक्तिक वाटतं?- का नाही? आयव्हीएफ प्रणाली हा जरी गंभीर विषय असला तरी प्रेक्षकांसाठी आम्ही तो अत्यंत हलकाफुलका बनवला आहे. गंभीर प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने आम्ही प्रेक्षकांसमोर ठेवली आहे. मी जर एखादी गंभीर डॉक्युमेंट्री बनवली तर ती कोण पाहणार? हा चित्रपट सामाजिक संदेशासोबतच फॅमिली एंटरटेनर आहे. त्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय.
* सामाजिक मुद्दयांवर आधारित चित्रपटांमध्येच काम करायचे, हे तू ठरवले आहेस का?- नाही, असं अगदीच काही नाही. सामाजिक विषयांवरच्याच चित्रपटांमध्ये काम करण्याचा असा काही माझा प्लॅन नाही. मी अशा मनोरंजक चित्रपटांमध्ये काम करतो, जे चित्रपट प्रेक्षकांना आपलेसे वाटतील, आवडतील. मी ‘हाऊसफुल्ल ४’ सारखे चित्रपटही केले आहेत. मला चाकोरीबाहेरचे चित्रपट करायला आवडतात. तेच ते विषय करायला मला आवडत नाही. भूमिकेतील नाविण्य मी कायम शोधत असतो.