बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची (Akshay Kumar) जादू सध्या ओसरलेली दिसतेय. त्याचे गेले काही चित्रपट बॉक्सऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. दोन महिन्यांपूर्वी रिलीज झालेला 'ओह माय गॉड 2' (OMG 2) फक्त थोडाफार चालला. तर नुकताच त्याचा 'मिशन रानीगंज' (Mission Raniganj) रिलीज झाला आहे. अक्षय कुमारला या सिनेमाकडून अपेक्षा होती मात्र हाही सिनेमा कमाल दाखवू शकलेला नाही. अगदी एकावर एक फ्री तिकीटाची ऑफर देऊनही थिएटर ओस पडले. सध्या हा सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात अपयशी ठरलाय.
अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा स्टारर मिशन रानीगंज सत्य घटनेवर आधारित आहे. सहसा सत्य घटनेवरील चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. मात्र अक्षयसोबत यावेळी उलट घडलं. प्रेक्षकांनी या सिनेमाकडे पाठ फिरवली. पहिल्या दिवशी सिनेमाने 2.80 कोटींचा बिझनेस केला. तर दुसऱ्या दिवशी 4.80 आणि तिसऱ्या दिवशी 5 कोटींचा गल्ला जमवला. चौथ्या दिवशी मात्र सिनेमाच्या कमाईत घट झाली. सिनेमाने 1.50 कोटी कमावले. पाचव्या आणि सहाव्या दिवशीही सिनेमा 1.50 कोटी कमावू शकला. आजही सिनेमाने १ कोटी कमावले तर एकूण कमाई १८ कोटींपर्यंत पोहोचेल.
'मिशन रानीगंज' मध्ये अक्षय कुमारने जसवंत सिंह गिलची भूमिका निभावली आहे. १९८९ साली कोळसा खाणीत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेची ही कहाणी आहे. जसवंत सिंह यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावत इतरांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने सम्मानित करण्यात आलं होतं.