बॉलिवूडचा ‘खिलाडी’अक्षय कुमार (Akshay Kumar ), धनुष (Dhanush) व सारा अली खानच्या (Sara Ali Khan) ‘अतरंगी रे’ (AtrangiRe )हा सिनेमा गेल्या 24 डिसेंबरला ओटीटीवर रिलीज झाला आणि आता रिलीजच्या सहा दिवसानंतर या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावर #BoycottAtrangiRe ट्रेंड करतोय.
या चित्रपटात सारा अली खानने रिंकू नावाच्या एका बिहारी मुलीची भूमिका साकारली आहे. घरचे रिंकूचं लग्न दिल्लीत डॉक्टर असलेल्या विशू (धनुष) याच्याशी जबरदस्तीनं लावून देतात. दोघांनाही दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसवून दिलं जातं. रिंकूच्या मते, तिचा आधीच प्रियकर आहे. त्याच्यासाठी ती आपल्या पतीलाही सोडायला तयार असते. सज्जाद अली नावाचा तिचा हा प्रियकर जादूगार असतो. ही भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे. इकडे विशूचाही साखरपुडा ठरलेला. हे लग्न दोघांनाही मान्य नसतं. त्यामुळे रिंकूचा आफ्रिकेत जादू शिकण्यासाठी गेलेला सज्जाद परत येईपर्यंत सोबत राहायचं, असं विशू आणि रिंकूचं ठरतं, अशी ही कथा.
मुळात या कथेतील सज्जाद अलीचं पात्र लोकांना रूचलेलं नाही. त्याच्यासाठी रिंकू वारंवार घर सोडून पळून जाते, यावर आक्षेप घेत, अनेकांनी याचा संबंध ‘लव्ह जिहाद’शी जोडला आहे. यामुळे या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. चित्रपटात हिंदूना क्रूर दाखवल्याचा (रिंकूचे घरचे बळजबरीने तिचं लग्न लावून देतात) दावाही काहींनी केला आहे.‘अतरंगी रे’विरोधातील या मोहिमेत सर्वाधिक अक्षय कुमारला ट्रोल केलं जातंय.
अक्षय कुमारच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटानंतर पृथ्वीराज, बच्चन पांडे, रक्षा बंधन, राम सेतु आणि ओह माय गॉड 2 या चित्रपटात तो दिसणार आहे. तर दुसरीकडे सारा अली खान ही अभिनेता विकी कौशलसोबत ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’या चित्रपटात दिसणार आहे.