Join us

अक्षय कुमार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजर, कारण आलं समोर; Video शेअर करत दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 11:29 AM

टायगर श्रॉफसोबत शेअर केला व्हिडिओ, अक्षयच्या गैरहजेरीचं कारण आलं समोर

उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरी आज रामनामाच्या गजरात दुमदुमणार आहे. १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. अनेक मान्यवर अयोध्येत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूड तारे तारकांनाही सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट, माधुरी दीक्षित, विकी कौशलसह अनेक कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत. दरम्यान 'खिलाडी' अक्षय कुमारने (Akshay Kumar) व्हिडिओ शेअर अयोध्येला जाणार नसल्याचं सांगितलं आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफही आहे. दोघंही अयोध्येला जाऊ शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यामागचं कारण सांगत ते म्हणाले,'जय श्रीराम, आजचा दिवस संपूर्ण देशभरातील रामभक्तांसाठी महत्वाचा आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलला आपल्या अयोध्येतील घरी भव्य मंदिरात येत आहेत.'

टायगर श्रॉफ म्हणाला,'लहानपणापासून आपण याबद्दल इतकं ऐकलं आहे आणि आज हा दिवस आला आहे, तो आपण बघत आहोत. आता आपण सगळेच दिवा लावून श्रीरामाचा उत्सव साजरा करण्याची प्रतिक्षा करत आहोत.' 

दोघांनी सर्व देशवासियांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र अक्षय कुमार अयोध्येत का गेला नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. माध्यम रिपोर्टनुसार, अक्षयने आधीच आयोजकांना ही कल्पना दिली होती की तो प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही. फिल्म शूटच्या काही कमिटमेंट्स असल्याने तो अयोध्येला जाऊ शकला नाही. टायगर ़श्रॉफही त्याच्यासोबत शूटमध्ये व्यस्त आहे. त्यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमाच्या शूटिंगसाठी दोघंही जॉर्डनमध्ये आहेत. टायगरचे वडील जॅकी श्रॉफ मात्र अयोध्येत पोहोचले आहेत. 

अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, आशा भोसले, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, प्रसून जोशी, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय क्रिकेट जगतातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली, हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांसारख्या अनेक खेळाडूंना सुद्धा आमंत्रित करण्यात आले आहे.

टॅग्स :अक्षय कुमारटायगर श्रॉफराम मंदिरअयोध्या