'खिलाडियो को खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. नुकतेच 'इन टू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स'शोमध्ये सहभागी झाला होता. या शोचे प्रोमोही टीव्हीवर झळकू लागले आहेत. या शोमध्ये जंगलातील विविध गोष्टी अक्षय कुमारने अनुभवल्या.
मात्र सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे या शोच्या सुत्रसंचालक बेअर ग्रिल्ससोबत हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेल्या चहा घेतल्याचे पाहायला मिळणार आहे. अक्षय आणि बिअर यांच्या अॅडव्हेंचरने परिपूर्ण या कार्यक्रमातून खिलाडी अक्षय कुमारचा वेगळा अंदाज रसिकांच्या समोर येणार आहे. अक्षय बेअर ग्रिल्स सोबत जंगलात फिरताना आणि स्टंट करताना पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच नरेंद्र मोदी आणि रजनीकांत हे देखील या शोमध्ये सहभागी झाले होते. या दोघांमुळे या शोची तुफान चर्चा झाली होती.
हा शो हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये भारतासह जपान, चीन, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशियासह 50 देशांमध्ये प्रसारित होणार आहे.
वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाले तर अक्षय रुपेरी पडद्यावर पृथ्वीराज चौहान ही ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. केसरी सिनेमानंतर अक्षयचा हा तिसरा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला सिनेमा असेल.