अक्षय कुमार (Akshay Kumar), आर माधवन आणि अनन्या पांडे यांचा 'केसरी २' आज सर्वत्र रिलीज झाला. जालियनवाला बाग हत्याकांडामागचं सत्य या सिनेमातून उलगडण्यात आलं आहे. अक्षय कुमारने सिनेमात सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे. ज्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात कोर्टात लढा दिला होता. सिनेमाच्या रिलीजनंतर आता अक्षयने काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
अक्षय कुमारने सिनेमातील काही फोटो शेअर करत लिहिले, "तुम्ही याआधी बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील पण हे एक वादळ आहे. सी. शंकरन नायर यांच्या या कहाणीने मला अक्षरश: जागं केलं. कारण आपल्याला ही कल्पनाच नव्हती की जालियनवाला बाग हत्याकांडानंतर एका व्यक्तीने संपूर्ण ब्रिटीश एंपायरला कोर्टात ओढून गुडघ्यावर बसायला भाग पाडलं."
तो पुढे लिहितो, "केसरी चॅप्टर २' सिनेमात मी फक्त कलाकार म्हणून नाही तर भारतीय म्हणून बोलत आहे. हा फक्त सिनेमा नाही...एक अपूर्ण राहिलेला हिशोब आहे, एक वेदनादायी आठवण आहे...आणि शेवटी हा न्याय आहे."
'केसरी २'चं दिग्दर्शन करण सिंह त्यागी यांनी केलं आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत सिनेमा बनला आहे. 'केसरी चॅप्टर १' मध्येही अक्षय कुमारने आपल्या अभिनयाने सर्वांना अचंबित केलं होतं. आता चॅप्टर २ मध्येही त्याचं कौतुक होत आहे.