Akshay Kumar Sells Mumbai Apartment: बॉलिवूडमधील गाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar). अक्षयला सिनेमे करायला जेवढे आवडतात तेवढेच त्याला प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणेही आवडते. त्याची ही आवड फारशी कोणाला माहीत नसेल. योग्य गुंतवणुकीत त्याचा हात कोणीच पकडू शकत नाही, हे तर एव्हाना साऱ्या बॉलिवूडकरांनी मान्य केलं आहे. अक्षयच्या मुंबईत अनेक प्रॉपर्टीज आहेत. यातलं एक अपार्टमेंट (Apartment) अक्षयनं विकल्याचं समोर आलं आहे. या विक्रीतून थोडीथोडकी नव्हे तर कोटींची रक्कम मिळवली आहे.
अक्षयनं बोरिवलीतलं अपार्टमेंट ४.२५ कोटींना विकलं आहे. अक्षय कुमारने विक्री केलेलं हे अपार्टमेंट स्काय सिटीमध्ये आहे. स्काय सिटी हे ओबेरॉय रिअॅल्टीने विकसित केली असून ती २५ एकरमध्ये पसरलेली आहे. अक्षयनं नोव्हेंबर २०१७ मध्ये २.३८ कोटींना हे अपार्टमेंट खरेदी केलं होतं. अपार्टमेंटची खरेदी करतानाची किंमत आणि विकताना आकडा पाहिला तर अक्षयला मोठा नफा झाल्याचं दिसतंय. केवळ ७ वर्षात त्यानं तब्बल २ कोटी कमावले आहेत.
Square Yardsनं दिलेल्या माहितीनुसार, या अपार्टमेंटचं क्षेत्रफळ हे १,०७३ चौरस फूट आहे. त्यात दोन कारसाठी पार्किंगची देखील सुविधा आहे. विक्रीदरम्यान या व्यवहारात २५.५ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांची नोंदणी फी देखील भरण्यात आली. आयजीआर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन रेकॉर्डनुसार, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन सारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांच्या ओबेरॉय स्काय सिटीमध्ये मालमत्ता आहेत.
GQच्या वृत्तानुसार, अक्षय कुमारचा खार पश्चिमेतील जॉय लेजेंडमध्ये एक आलिशान फ्लॅट देखील आहे. २०२२ मध्ये खार पश्चिमेतील या फ्लॅटसाठी अभिनेत्याने ७.८ कोटी रुपये मोजले होते. अक्षय कुमारचा हा फ्लॅट निवासी संकुलाच्या १९ व्या मजल्यावर आहे आणि १८७८ चौरस फूट जागेत पसरलेला आहे.
अक्षय हा सध्या त्याची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि दोन मुलांसोबत मुंबईतील जुहू येथे एका आलिशान समुद्रकिनाऱ्यावरील डुप्लेक्समध्ये राहतो. या आलिशान घराची किंमत ८० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. महत्वाचं म्हणजे या घरातून अरबी समुद्राचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा 'स्काय फोर्स' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.