अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील खिलाडी म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमार गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकत आहे. अक्षयला आपण विविध भूमिकांमध्ये कधी हसवताना, कधी रडवताना तर कधी तगडी अॅक्शन करताना पाहिलंय. अक्षय सध्या त्याचे आवडते दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या आगामी सिनेमात काम करणार आहे. या सिनेमाचं नाव 'भूत बंगला'. अक्षय कुमारच्या या आगामी सिनेमाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आलीय.
'भूत बंगला' कधी रिलीज होणार?
अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'भूत बंगला'ची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आलीय. 'भूत बंगला' पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही महिने वाट बघावी लागणार आहे. 'भूत बंगला' सिनेमा २ एप्रिल २०२६ ला रिलीज होणार आहे. म्हणजेच 'भूत बंगला' पाहण्यासाठी प्रेक्षकांना तब्बल दीड वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 'भूत बंगला'चं नवं पोस्टर शेअर करुन अक्षयने ही आनंदाची बातमी सर्वांना दिलीय. लवकरच 'भूत बंगला'च्या शूटिंगला सुरुवात होईल.
'भूत बंगला' सिनेमाविषयी थोडंसं
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'भूल भूलैय्या ३' अन् 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी सिनेमांपेक्षाही 'भूत बंगला' भयानक असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'हेरा फेरी', 'भूल भूलैय्या', 'चुप चुप के' अशा कॉमेडी सिनेमांचे दिग्दर्शक प्रियदर्शन पुन्हा एकदा 'भूत बंगला' निमित्ताने अक्षय कुमारसोबत काम करण्यास सज्ज आहेत. या सिनेमात अक्षय कुमारसोबत आणखी कोणते कलाकार असणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.