Join us

याचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा...! अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 12:56 PM

उद्देश चांगला होता. पण नेटक-यांना अक्षयची ट्रेडमिलवरची ‘पायपीट’ फार काही रूचली नाही. मग काय अक्की सोशल मीडियावर ट्रोल झाला.

ठळक मुद्देएसीचे तापमान सामान्य असेन अशी आशा करतो, असे लिहित एका युजरने अक्षयच्या या ट्रेडमिल इव्हेंटची मजा घेतली.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार चित्रपटांसोबतच त्याच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो. अलीकडे अक्षय अशाच एका सामाजिक कार्यात सहभागी झाला. पाण्यासाठी वणवण भटकणा-या, अनेक किमी. पायपीट करणा-या देशातील महिलांचे दु:ख जगासमोर आणण्यासाठी  अक्षयने काय करावे तर तो ट्रेडमिलवर 21 किमी पायी चालला. उद्देश चांगला होता. पण नेटक-यांना अक्षयची ट्रेडमिलवरची ‘पायपीट’ फार काही रूचली नाही. मग काय अक्की सोशल मीडियावर ट्रोल झाला.

तर झाले असे की, अक्षयने अलीकडे ‘मिशन पानी वॉटरथॉन’ला पाठींबा दिला. या अंतर्गत तो ट्रेडमिलवर 21 किमी चालला. अनेक किमी. पायपीट करून डोक्यावर पाणी वाहून आणणा-या महिलांची व्यथा समजावून सांगणे हा त्याचा उद्देश होता. पाणी वाहून आणणा-या महिलांचे भयानक हाल होतात, हे लोकांना पटवून देण्याचा आणि पाणी वाचवण्याचा सल्ला त्याने यावेळी दिला. पण यामुळे हा फंडा नेटक-यांना फार आवडला नाही. मग काय, तो जबरदस्त ट्रोल झाला.

डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन अनेक किलोमीटरवर वरून पाणी आणणा-या महिला आणि अक्षयचा ट्रेडमिलवरचा हा स्टंट यात काही तरी लॉजिक आहे का? असा सवाल अनेक नेटक-यांनी केला.

ट्रेडमिल आणि एसी रूममधून बाहेर पड. डोक्यावर एक हंडा घेत आणि अनवाणी पायाने वाळवंटात वा रस्त्यावर चाल, मग त्या महिलांच्या खरा व्यथा समजतील, असे एका युजरने लिहिले. याचे ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा, अशा शब्दांत काही युजर्सनी अक्षयची खिल्ली उडवली.

एसीचे तापमान सामान्य असेन अशी आशा करतो, असे लिहित एका युजरने अक्षयच्या या ट्रेडमिल इव्हेंटची मजा घेतली.

टॅग्स :अक्षय कुमार